
मनोज सातवी, पालघर
गुजरातच्या किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात तीन बोटी बुडाल्याची घटना समोर आली आहे. सोमनाथजवळ समुद्रात तीन मच्छीमार बोटी बुडाल्याची माहिती आहे. यातील एका बोटीमध्ये 15 नॉटिकल मैल अंतरावर असतानाच पाणी शिरू लागले होते.
इतर बोटींनी तिला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तुफानी लाटा आणि वादळामुळे अखेर ती बोट समुद्रात बुडाली. या बोटीवरील सर्व 8 मच्छीमारांना इतर बोटींच्या मदतीने वाचवण्यात आले. वाचलेले मच्छीमार हे पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरातच्या उमरगाम तालुक्यातील आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
(नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?)
या वादळी परिस्थितीमुळे अनेक मच्छिमार बोटी सुरक्षित बंदरांकडे स्थलांतरित झाल्या आहेत. गुजरातच्या 12 बोटींनी महाराष्ट्रातील वसई बंदरात आश्रय घेतला आहे. तसेच, पालघरमधील 4 बोटी गुजरातच्या नवा बंदरात थांबल्या आहेत. दोन्ही राज्यांतील मच्छिमारांनी वादळी परिस्थितीचा अंदाज घेत एकमेकांच्या बंदरात आश्रय घेतला आहे.
(नक्की वाचा - Jayakwadi Dam : मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला! जायकवाडी धरण 96 टक्क्यांवर; धरणाचे 18 दरवाजे दुसऱ्यांदा उघडले)
वादळामुळे समुद्रात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून किनारपट्टीवरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world