मनोज सातवी, पालघर:
Palghar Accident: पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांच्या भितीने रेल्वे रुळ ओलांडून पळत असताना मालगाडीच्या धडकेत तिन्हा तरुणांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या भितीने पळताना अपघात?
समोर आलेल्या माहितीनुसार, पालघर शहरात मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणांची ओळख स्वप्निल शैलेश पालांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी झाली असून तिघेही पालघर पूर्वेतील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
तीन तरुणांच्या मृत्यूने खळबळ
ही घटना पालघर पूर्वेतील जुना पालघर येथील जैन मंदिराजवळ घडली. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. घटनेपूर्वी काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले होते आणि त्यांनी तरुणांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या भीतीने तरुण पळत असताना जवळील रेल्वे रुळांवरून जात असताना त्याच वेळी मालगाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासानंतरच अपघात नेमका कशा परिस्थितीत झाला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नक्की वाचा >> Pune News : रांजणगाव गणपती मंदिरासमोर सर्वात भयानक घटना! पुणे-अहिल्यानगरच्या प्रवाशांची पळापळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world