रामराजे शिंदे, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. ही सुनावणी आज होत असल्याने सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि NCP शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा युक्तिवाद शरद पवार यांच्या वकिलांनी केला गेला होता. त्यावेळी कोर्टाने अजित पवार यांना "तुम्ही वेगळी भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं रहा" असा सल्ला दिला होता.
(नक्की वाचा- Zepto कडून iphone युजर्सवर अन्याय? Android च्या तुलनेने वस्तू महाग विकल्या जात असल्याच आरोप)
काय आहे प्रकरण?
6 फेब्रुवारी 2024 ला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती. या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. तर शरद पवार यांना 22 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. NCP शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार यांच्या गटाचं म्हणणं आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर मार्चमध्ये सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता. यावर न्यायालयाने “आम्ही शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही असं लिखित द्या”, असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता. त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.
(नक्की वाचा- MHADA Lottery : 713 घरांसाठी एकही अर्ज नाही, म्हाडाच्या लॉटरीची 5 फेब्रुवारीला सोडत )
शरद पवार यांच्या पक्षाने न्यायालयाकडे केलेल्या मागण्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.