
Pune News : आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देते. त्या संधीचा फायदा घेणे ज्याच्या त्याच्या हातामध्ये असते. एखादा गुन्हा केल्यानंतर त्याची शिक्षा भोगून आलेल्या कैद्यांनाही नवं आयुष्य जगण्याची संधी मिळते. त्या संधीचं सोनं करणं हे महत्त्वाचं असतं. पुण्यातल्या दोन जणांनी ते करुन दाखवलं आहे. या पुणेकरांनी पुण्यात भेळ आणि पाणीपुरीचा स्टॉल टाकलाय. केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ही फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. 'प्रेरणादायी परिवर्तनाची साक्ष' असं त्यांनी या भेटीचं वर्णन या पोस्टमध्ये केलंय. या पोस्टमध्ये मोहोळ यांनी लिहिलं आहे की, 'जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या दोन तरुणांनी ‘प्रेरणापथ' उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आयुष्याला नवी दिशा दिली. यावेळी त्यांनी सुरु केलेल्या भेळ व पाणीपुरीच्या स्टॉलला भेट देऊन त्यांनी बनवलेल्या भेळ पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
( नक्की वाचा : Kalyan News: अकरावीमध्ये नापास झाला, पण हिंमत नाही हरला, पाणीपुरीवाल्याचा मुलगा IIT मध्ये पोहोचला )
भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांनी ‘प्रेरणापथ' या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून या दोन तरुणांना स्वतःचा भेळ व पाणीपुरीचा स्टॉल उभा करून देण्यास मदत केली. तसेच मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने या उपक्रमाला सहकार्य केले.
( नक्की वाचा: Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )
याप्रसंगी दोघांशी आत्मियतेने संवाद साधला व त्यांना नव्या प्रवासाविषयी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांत दिसणारी आशा, स्वाभिमान आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मन हेलावून गेला.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world