छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात नेमकं काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या आठवड्याभरात संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन घटनांवरुन ठाकरे गटामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाचे एक आमदार थेट विमानतळावर पोहोचले. त्यांच्या या भेटीची मोठी चर्चा केली जात आहे. दुसरी घटना म्हणजे बदलापुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरे गटाकडून क्रांती चौकात तोंडाला काळी फीत बांधून आंदोलन करण्यात आलं. मात्र अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते. तर खैरे यांनी आपला वेगळं आंदोलन संभाजीनगरच्या शिवसेना भवनसमोर केलं. त्यामुळे पुन्हा एकदा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वादाची चर्चा पाहायला मिळत आहे.
पहिली घटना...
ठाकरे गटाचा आमदार मोदींच्या स्वागताला विमानतळावर
- ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर होते. मोदींच्या स्वागतासाठी आमदार राजपूत संभाजीनगर विमानतळावर पोहचले. राजपूत मोदींच्या स्वागताला गेल्याने चर्चेला उधाण आलं आहे. उदय सिंग राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
नक्की वाचा - महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आलबेल नाही, पुण्यातील पोस्टरवरुन नवा वाद रंगणार!
दुसरी घटना
वेगवेगळं आंदोलन..
- बदलापूर प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुक आंदोलनाची घोषणा केली होती. ठाकरे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर आज शनिवारी संभाजीनगर शहरात ठाकरे गटाकडून क्रांती चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आलेच नाहीत. त्यामुळे खैरे का आले नाहीत याची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आपण आंदोलन केल्याचे खैरे यांनी सांगितले. दरम्यान मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो पण तसं करण्याची कोणाची हिंम्मत नाही. ते तसे करू शकत नाही. मी वस्ताद आहे, अशा शब्दात खैरेनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world