राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून आता राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केल्याचे तांत्रिक कारण पुढे करत सरकारने राज्यातील तब्बल 80 लाख लाभार्थी महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले आहे. या धक्कादायक निर्णयावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
"लोकसभेतील पराभवामुळे घाईघाईत पैसे वाटले"
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी थेट सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जयंत पाटलांनी म्हटलं की, "लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत (पराभव) पाहता, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळवण्यासाठी सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम घाईघाईत हाती घेतला. मात्र, आता निवडणूक संपताच याच योजनेच्या तब्बल 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. हा सरळ सरळ महिलांचा विश्वासघात आहे."
(नक्की वाचा- Pune News: भारतातील ट्रॅफिकवर उपाय! उबर ड्रायव्हरचा सल्ला अन् एक वाक्य ऐकून अमेरिकन फाऊंडर थक्क)

राज्यावरील आर्थिक संकटाचे द्योतक
जयंत पाटील यांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, 80 लाख महिलांना एकाच फटक्यात बाद करणे हा प्रशासकीय निर्णय नसून राज्यावरील मोठ्या आर्थिक संकटाचे लक्षण आहे. देशापाठोपाठ आता राज्याची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच जागतिक मंदीची भर पडल्यामुळे सरकारकडे निधीची कमतरता भासत आहे. या आर्थिक संकटामुळेच सरकारने महिलांची कपात सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
(नक्की वाचा- Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)
योजना हळूहळू बंद करण्याचा डाव?
आज सरकारने 80 लाख महिलांना अपात्र केले आहे, उद्या अशीच काहीतरी वेगळी कारणे दाखवून आणखी काही लाख महिलांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. ही योजना भविष्यात पूर्णपणे बंद केली तरी त्यात आश्चर्य वाटायला नको, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली. "शासनाने या योजनेची घोषणा करण्यापूर्वीच तिचे आर्थिक आणि प्रशासकीय नियोजन केले असते, तर आज माता-भगिनींवर ही वेळ आली नसती," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world