- कल्याण एसीपी कार्यालयात साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा नाग अचानक शिरला
- महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी भीतीने तब्बल अर्धा तास स्वतःला खोलीत बंद केले
- सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन अत्यंत दक्षतेने नागाला पकडून वन विभागाला सुपूर्द केले
कल्याणमध्ये शुक्रवारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण एसीपी कार्यालयात साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. कार्यालयात काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी तब्बल अर्धा तास स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत नागाला पकडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्याचीच चर्चा दिवसभर एसीपी कार्यालयात सुरू होती. मात्र या सापाच्या एन्ट्रीने सर्वांची एकच धावपळ उडाली.
कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या ACP कार्यालयात अचानक साडेपाच फुटांचा इंडियन कोब्रा शिरला. त्यामुळे कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.नकळत कार्यालयात घुसलेल्या या अतिविषारी नागामुळे कर्मचारी घाबरले. विशेषतः एका खोलीत काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ दरवाजा बंद करून स्वतःला सुरक्षित ठेवत, तब्बल अर्धा तास आतमध्येच कोंडून घेतले. यानंतर हा नाग ACP यांच्या मुख्य कक्षाच्या दिशेने सरकत असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी खोलीबाहेर पडत सुरक्षित स्थळी धाव घेतली.
सुदैवाने घटनेच्या वेळी ACP कार्यालयात उपस्थित नव्हते. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून अत्यंत दक्षतेने या अतिविषारी नागाचा रेस्क्यू केला. त्यानंतर नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्पमित्रांनी सांगितले की, 20 वर्षांच्या अनुभवात इतक्या गजबजलेल्या कार्यालयात असा मोठा आणि विषारी नाग निघणे दुर्मिळ आहे. हा नाग कार्यालयात नेमका कसा शिरला, हा आम्हालाही पडलेला प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world