अमजद खान
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी महापौर हर्षाली थविल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पुढाकार घेतला असला तरी अधिकारी मात्र त्यांना गांभिर्याने घ्यायला तयार नाहीत अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर महापौरच हतबल झाल्याचं समोर आलं आहे. महापौर हर्षाली थविल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्या अधिकाऱ्यांसमोर कशी हतबल झाल्या आहेत. अधिकारी त्याचं कसं काही ऐकत नाहीत हेच समोर आलं आहे. त्यात नागरिक ही जर अधिकारी तुम्हालाच विचारत नसतील तर आमचं काय? असा प्रश्न महापौरांना करताना दिसत आहेत.
कल्याण पूर्वेतील द्वारली आणि नांदीवली परिसराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. महापौरांनी स्वत: हा दौरा केला. या दौऱ्यात त्या परिसरातील वॉर्ड ऑफिसर उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांना तशी कल्पनाही देण्यात आली होती. पण महापौर आल्या पण अधिकारी मात्र गायब होते अशी स्थिती त्या ठिकाणी झाली. वार्ड ऑफीसर सुनील लोंढे आणि केडीएमसीचे कर्मचारी तिथे गैरहजर होते. हे पाहाताच महापौर मॅडमचा पारा चढला.त्यांनी थेट संबंधीत अधिकाऱ्याला फोन लावला. त्याला फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग काय? त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अधिकाऱ्याची उत्तर तयार होती. त्यामुळे महापौर मॅडम हतबल झाल्याचे यावेळी दिसून आले. वार्ड अधिकारी असे वागत असतील तर मोठ्या अधिकाऱ्यांबाबत न बोललेलं बरं अशी स्थिती त्यावेळी निर्माण झाली होती.
महापौर हर्षाली थविल यांनी संबंधीत अधिकाऱ्याला आवातावाने फोन केला. मी येणार हे तुम्हाला माहित होते ना. तुम्हाला मेसेज मिळाला होता ना. मग तुम्ही माझ्या आधी इथं हजर असायला पाहीजे होते. तुम्ही का आला नाहीत असा जाब त्यांनी संबंधीत वार्ड अधिकाऱ्यावर उपस्थित केला. आम्ही इथं सर्व आलो आहोत आणि तुम्हीच आला नाहीत. तुम्ही यायला पाहीजे होतं असं त्या म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तुम्ही आमचा फोन ही उचलत नाही. सकाळीच नऊ- दहा वाजता तुम्ही इथं अपेक्षित होता. माझ्या दौऱ्याची तुम्हाला माहित होती. पुढे काय होणार आहे ते विचारणे तुमचे कर्तव्य नाही का अशी विचारणा ही त्यांनी यावेळी केली.
पण समोरून अधिकारी महापौरांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होता. उडवा-उडवीची उत्तर देणं सुरू होतं. त्यातून तुम्ही ऑफीसमध्ये बसण्यासाठी आहात की लोकांचे समस्य जाणण्यासाठी आहात असा सवाल त्यांनी केला. त्यावर अधिकार म्हणाला की बघतो काय असेल ते? त्यावर महापौर म्हणाल्या बघतो काय तुमचे वार्डात लक्ष नाही. तुम्ही फक्त खुर्चीवर बसताय. तुमचा हलगर्जी पण खूप झाला. ऐवढं बोलून तरी संबंधीत अधिकारी तुम्ही आहात तिथे मी येतो असं म्हणाला नाही. उलट आता ही यायला जमणार नाही असं त्याने सांगून टाकलं. तसं स्वत: महापौर त्या व्हिडीओमध्ये तिथल्या नागरिकांना सांगत आहेत.एका महापौराची अधिकाऱ्यांसमोर इतकी हतबलता पाहून तिथल्या नागरिकांनाही काय करावे असा प्रश्न पडला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world