कल्याण-डोंबिवलीला काळीमा फासणारी घटना, 60 वर्षांच्या वृद्धांच्या कृत्याने शिवसेना शिंदे-ठाकरे गट आक्रमक

कल्याणमधील या प्रकरणात कोळपेवाडी पोलिसांनी दोघे नराधम अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News : कल्याणमध्ये कचरा गोळा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोघेही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात कोळपेवाडी पोलिसांनी दोघे नराधम अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना अटक केली आहे.

कल्याणमधील त्या घटनेनंतर शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गट आक्रमक...

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि नगरसेविका माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याला भेट देत पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. महेश गायकवाड म्हणाले, ही घटना कल्याण-डोंबिवलीला काळीमा फासणारी आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे की, दोषींवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना आम्ही भेटून मदत करणार आहोत.

Advertisement

नक्की वाचा - Kalyan News:15 वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा, घरभर रक्ताचे डाग; 60 वर्षीय 2 वृद्धांच्या कृत्याने कल्याण हादरलं

दरम्यान, ठाकरे गटाने या घटनेवरून सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे ॲड. नीरज कुमार यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. कल्याण पूर्व भागात अशा घटना याआधीही घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर नेते आणि लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात येतात, मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. देवा भाऊंनी राज्यातील लाडकी बहिणींना पंधराशे रुपये देऊन राजकारण केलं.  मात्र महिलेच्या सुरक्षेवर कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर कल्याणमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.