कल्याण पूर्व परिसरातील दोन सख्या बहिणी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून शहरात तणावाचे आणि अफवांचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी या दोन्ही मुलींना सुरक्षित शोधून काढल्यानंतर जे सत्य समोर आले, त्याने सर्वांनाच चकित केले आहे. या मुलींनी आपल्या स्वतःच्या पालकांवरच छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मुली बेपत्ता झाल्यानंतर सुरुवातीला एका मुस्लीम तरुणावर आरोप करण्यात आले होते. हे प्रकरण 'लव्ह जिहाद'शी संबंधित असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या विषयात उडी घेत वातावरण तापवले होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात हे सर्व दावे फोल ठरले आहेत.
सावत्र आई आणि वडिलांचा जाच
मुलींना त्यांच्या मित्रांच्या घरातून पोलिसांनी शोधले. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी घरातील भीषण वास्तव सर्वांसमोर मांडले. सावत्र आई आणि वडील दोघींनाही सातत्याने मारहाण करत होते. आम्हाला पुढे शिक्षण घेऊ दिले जात नाही, असा गंभीर आरोप मुलींनी केला आहे. घरातील सततच्या त्रासाला कंटाळून आम्ही स्वतःच्या मर्जीने घर सोडले आहे. यात लव्ह जिहादचा कोणताही प्रकार नाही, असे दोघींनी पोलिसांना ठामपणे सांगितले.
(नक्की वाचा- पुण्यात खळबळ! कोट्यवधींच्या 'डिजिटल अरेस्ट' स्कॅममध्ये प्रसिद्ध 'रील स्टार'चा हात; पोलिसांकडून शोध सुरू)
आता पालकांसोबत राहायचे नाही
पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवताना दोन्ही बहिणींनी स्पष्ट केले की, त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या आई-वडिलांसोबत परत राहायचे नाही. मुलींच्या या खंबीर भूमिकेमुळे आता पोलिसांकडून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात किंवा सुरक्षित ठिकाणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
(नक्की वाचा- Thane News: सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक; ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक)
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सुरुवातीला लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांना कडक इशारा दिला आहे. "कोणतीही अधिकृत माहिती नसताना सामाजिक तेढ निर्माण होईल अशा अफवा पसरवू नका," असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world