पुणे पोलीसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिग्नलवर भिक मागण्यास किन्नर, भीक मागणारी लहान मुले, भिखारी यांना मज्जाव करण्यास आला आहे. शिवाय त्यांच्यासाठी जमाव बंदीही लागू करण्यात आली आहे. जर यापुढे लहान मुलं, किन्नर आणि भिकारी लोक जर रस्त्यावर भीक मागताना दिसले तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. या निर्णयामुळे किन्नरांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आता करायचं काय असा प्रश्नही त्यांनी केलाय.
पुणेकरांच्या तक्रारीनंतर कारवाई
पुण्यात घरी जाऊन तसेच चौकाचौकात गटागटाने तसेच एकट्याने नागरिकांना गाठून पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथियांच्या उपद्रव वाढला होता. याबाबत पोलीसांकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमिवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यांनी अशा उपद्रवी तृतीयपंथियांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सीआरपीसी कलम १४४ अन्वये निर्देश लागू केले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे किन्नर भिकाऱ्यांचा होणारा नाहक त्रास कमी होण्यास मदत होईल. यासोबतच विविध सण, लग्न, अंत्यविधी, जन्मविधी, उत्सव आदी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये निमंत्रणाशिवाय जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक आदी ठिकाणी लोकांकडे पैसे मागितल्यास कारवाई केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?
अनेकदा लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमात तसेच वाढदिवस, बारसे, नामकरण विधी या कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथी पैसे मागतात. अनेक वेळा पैशांसाठी जबरदस्ती ही केली जाते. लोकांनी तृतीयपंथियांना निमंत्रित न करताच ते अशा कार्यक्रमांमध्ये घुसतात. पैसे देण्यास नकार दिल्यास अश्लील हावभाव करतात. यातून नागरीकाना त्रास होतो. ही बाब निदर्शनास आली होती. असे अमितेश कुमार यांनी सांगितलं. यासोबतच गजबजलेली ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक अशा ठिकाणी तृतीयपंथियांची टोळकी वाहनचालक आणि नागरिकांना पैशांसाठी त्रास देताता. याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. वाहनचालकांना अडवून पैशांची मागणी करण्यात येते. पैसे न दिल्यास शिवीगाळीचे प्रकारही झाले आहेत. या सर्वाला आळा बसवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किन्नर समुदायात नाराजी
दरम्यान पुणे पोलीसांनी घेतलेल्या निर्णयाला किन्नर समुदायाने विरोध केला आहे. आम्हाला समाजात जगताना मानाचे स्थान नाही. रहाण्याची खाण्याची सोय नाही. कमवायचं योग्य साधन नाही. अशा स्थितीत भीक मागण्या शिवाय कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे नियम लागू करण्या आधी आमचा विचारायला हवा होता अशा भावना किन्नर समाजाकडून व्यक्त होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world