Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

Eknath Shinde on Ladki Bahin yojna : काटकसर करुन जे करायचं ते करु. आपल्या सगळ्या योजना सुरु ठेवायच्या आहे, विकासकामे करायची आहेत सगळं करत असताना जे बोललो ते करायचं आहे, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 3 mins

लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये कधी होणार? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. देशभरात अनेक सरकारनी या योजनेचं अनुकरण केलं. लाडकी बहीण या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला. ज्या विरोधकांनी खोडा घातला त्या सावत्र भावांना बहिणींनी चांगला जोडा दाखवला. तरीही विरोधकांमध्ये सुधारणा होत नाही. आमच्यावर आरोप सुरुच आहेत."

(नक्की वाचा-  Budget Session 2025: शिंदेंच्या कामांना स्थगिती? अखेर मुख्यमंत्री बोलले; विरोधकांना खडसावले)
 
"आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणी सावत्र झाल्या, त्यांचे 2100 रुपये कधी देणार, योजनेतून बहिणींची नावे का वगळता, असे आरोप आमच्यावर विरोधकांकडून सुरु आहेत. मात्र आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलले नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, एवढी खात्री बाळगा", असा शब्द देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

(नक्की वाचा-  Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले)

"लाडकी बहीण योजनेसाठी योग्य ती आर्थिक तजवीज करुन ही योजना राबवली जात आहे. आता 1500 रुपयांची ओवाळणी 2100 रुपये कशी आणि कधी करायची याची आखणी शिस्तबद्ध पद्धतीने करत आहोत. आमचं सरकार प्रिटिंग मिस्टेकवालं नाही. आम्ही बोललो ते करणार. काटकसर करुन जे करायचं ते करु. आपल्या सगळ्या योजना सुरु ठेवायच्या आहे, विकासकामे करायची आहेत सगळं करत असताना जे बोललो ते करायचं आहे", असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने आम्हाला दिला आशीर्वाद

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ऐतिहासिक विकासाकामे केली आणि कल्याणकारी योजना देखील आणल्या. विकासकामांच्या जोरावर जनतेने आम्हाला मोठं यश मिळवून दिले. राज्य सरकारच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं. आम्ही केलं काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने आम्हाला दिला आशीर्वाद, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विरोधी पक्षनेता मिळण्याइतक्या जागाही महाविकास आघाडीला मिळल्या नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. 

Advertisement

निवडणुका जिंकल्या सत्ता आली म्हणजे आमचं काम संपलं असं नाही. म्हणूनच आम्ही वेगाने काम सुरु केले आहे. पहिल्या 100 दिवसात काय काम केले पाहिजे, याचा अजेंडा फिक्स केला आहे आणि त्याचा आढावा आपण घेत आहोत. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या दारात घेऊ गेलो. पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. ही दिशा पुढच्या पाच वर्षांच्या विकासाची आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधकांना केवळ राजकारण करायचंय

विधानसभेचं अधिवेशन लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, न्याय देण्यासाठी, राज्यातील धोरणात्मक प्रश्नांना न्याय देण्यासाठी असते. सरकार चर्चा तयार आहे, उत्तरे द्यायला तयार आहे. विधिमंडळाचं पावित्र्य टिकवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. विरोधकांनीही ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. विरोधकांनी लोकांच्या समस्या, प्रश्न, धोरणात्मक प्रश्न मांडली पाहिजेच. त्याची उत्तरे मिळतील आणि लोकांना न्याय मिळेल. मात्र विरोधक गोंधळले आहेत, दिशाहीन झाले आहेत. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. त्यांना दुसरं काही सूचत नाही.  

Advertisement

Topics mentioned in this article