
गुजरातच्या वडोदरा येथील उड्डाणपूल कोसळल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक मोठा उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच खचला आहे. नव्याने बांधण्यात आलेला महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. पहिल्याच पावसात हे घडले आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 53 वरील या उड्डाणपुलाच्या एक बाजूने खचण्याने त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता देखील टेकडीचे दगड पडल्याने खचला आहे.
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील देवरी जवळून जाणाऱ्या मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग 53 वरील मासुलकसा घाट परिसरातील पुलावर पडले मोठे भगदाड पडले असून या उड्डाणपुलावर चक्क भेगा पडल्या आहेत. अवघ्या 6 महिन्यापूर्वी सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र, या घटनेने कंत्राटदार कंपनीने केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी निर्माण कार्य होत असताना कशा पद्धतीने देखरेख ठेवली आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या क्वालिटी कंट्रोल विभागाने कामाच्या दर्जाची पडताळणी नेमकी कशी केली, असे प्रश्न उभे झाले आहेत.
(नक्की वाचा- Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती)
गोंदिया जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (मुंबई-कोलकाता) वर मासुलकसा घाट परिसरात 6 महिन्यापूर्वी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावर मोठे भगदाड पडले आहे. तर या उड्डाणपुलाला भेगा देखील पडल्या असून पुलावरील सुरक्षा भिंत देखील खचली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात या बांधकामाच्या दर्जाचे आणि निर्माण कार्य करणाऱ्या कंपनीचे पितळ उघडे पडले असून या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
या उड्डाणपुलाजवळ आता बघ्यांची गर्दी होत असून उड्डाणपुलाचे निर्माण कार्य करणाऱ्या बांधकाम कंपनीची चौकशी करून कंपनीवर कारवाईची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. या घटनेच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. नुकतेच, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रेल्वे ओव्हरब्रिज वर उद्घाटनापूर्वी मोठे खड्डे निर्माण झाले. त्या उड्डाणपुलाप्रमाणे हा उड्डाणपूल देखील पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली असून आता उड्डाणपूल एका बाजूने खचल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
(Mumbai News: लवकरच ‘बालभारती'ची नवीन सुसज्ज इमारत उभारणार: शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर)
महामार्ग देखीख खचला
एवढेच नव्हे तर याच परिसरातील मासुलकसा घाट येथे टेकडीवरून भूस्खलन झाल्याने मोठे दगड याच राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच हायवे रस्त्यावर पडले ज्यामुळे, राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. या घटनेने महामार्गाच्या निर्माण कार्याच्या गुणवत्तेचे देखील पितळ उघडे पडले आहे. महामार्गाच्या निर्माण कार्याचे नियोजन करताना टेकडीवरून भूस्खलनाची संभावना लक्षात घेतली नव्हती काय, तसेच निव्वळ दगड पडल्याने रस्ता खचला, हे कशाचे संकेत आहे असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world