जाहिरात

Nagpur News: नागपुरात भाजपाच्या 'मिशन 120' ला घरचा आहेर; नाराज माजी नगरसेवकांकडून गुप्त मोहिमेची आखणी

Nagpur News: नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे संकट उभे राहिले असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे.

Nagpur News: नागपुरात भाजपाच्या 'मिशन 120' ला घरचा आहेर; नाराज माजी नगरसेवकांकडून गुप्त मोहिमेची आखणी
नागपूर:

Nagpur Municipal Corporation Election 2026: नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे संकट उभे राहिले असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे. मिशन 120 चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भाजपला या अंतर्गत नाराजीमुळे शहरातील सुमारे 25 जागांवर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी दिल्याने पक्षात आता उघड संघर्ष पाहायला मिळत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या 151 पैकी 105 जागांवर महायुतीने नवे चेहरे रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये अनेक उमेदवार नवखे असून त्यांना निवडणूक लढवण्याचा कोणताही अनुभव नाही. 

पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात अनेक माजी नगरसेवकांचा अहवाल नकारात्मक आल्याचे सांगत तब्बल 50 माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पातळीवरून झालेल्या या निर्णयामुळे भाजपच्या गोटात असंतोषाचा ज्वालामुखी उफाळून आला आहे.

( नक्की वाचा : Akola News: 5 तासांत आरोपी जेरबंद, पण नातेवाईक आक्रमक; अकोल्यातील काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणात नवा खुलासा )

माजी नगरसेवकांनी आखली गुप्त रणनीती

भाजपमधील ही नाराजी केवळ शाब्दिक उरली नसून आता ती गुप्त बैठकांपर्यंत पोहोचली आहे. शहरातील विविध भागांत नाराज माजी नगरसेवकांनी स्वतंत्र बैठका घेऊन रणनीती ठरवल्याची माहिती समोर येत आहे. 

आपल्या प्रभागातील अधिकृत उमेदवारांसाठी काम करू नका, सभांना गर्दी जमवू नका आणि प्रचारापासून लांब राहा, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष मदत करण्याची तयारीही या गटाने दर्शवली आहे. यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची तटबंदी कमकुवत होताना दिसत आहे.

संघाचे स्वयंसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्तेही संभ्रमात

केवळ माजी नगरसेवकच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे जुने कार्यकर्तेही या तिकीट वाटपामुळे नाराज आहेत. अभाविपच्या पदाधिकारी आसावरी कोठीवान यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. 

गेल्या 38 वर्षांपासून संघाचे आणि भाजपचे काम करत असूनही प्रभागात बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच नाराजीतून त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी महामंत्री सुनील मानेकर यांनी तर थेट भाजपला सोडचिठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.

(नक्की वाचा : Akola News : अकोटचा AIMIM बरोबरचा'अनाकलनीय' प्रयोग भाजपाला झोंबला; 'त्या' आमदारावर होणार मोठी कारवाई! )

काँग्रेस उमेदवाराला दहा लाखांचे आमिष दाखवल्याचा आरोप

निवडणुकीच्या या गोंधळात आता पैशांच्या आमिषाचे आरोपही होऊ लागले आहेत. प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामकृष्ण गजबे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 10 लाख रुपयांचे आमिष दाखवल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. गजबे यांनी दावा केला आहे की, त्यांना स्वतःला 7 लाख आणि त्यांच्या पोल एजंटला 3 लाख रुपये देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. मात्र, त्यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचा रणनीतीवर विश्वास आणि बंडखोरी रोखण्याचे आव्हान

या सर्व बंडाळीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवकांची तिकिटे काटणे हा पक्षाच्या विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींचीही तिकिटे कापली असून, केवळ निवडून येण्याची क्षमता (इलेक्टिव्ह मेरिट) याच निकषावर उमेदवारी दिल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. गडकरी आणि फडणवीस हे या बंडखोरांना शांत करण्यास सक्षम असल्याचा विश्वासही पक्षाकडून व्यक्त केला जात असला तरी, प्रत्यक्ष मैदानात भाजपची ही रणनीती यशस्वी ठरणार की बंडखोर मुळावर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com