Nagpur Crime: नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीने चिंता वाढवली आहे. नागपूरमध्ये खून, दरोडे, मारामाऱ्यांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशातच उपराजधानीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मित्रांकडून मित्राची हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मैत्रिणीला पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित संघर्षात झाले. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मित्र गंभीर जखमी आहे. तंशू नागपुरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जिवलग मित्रांमध्येच घडलेल्या या या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तंशू नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे तिघे जण मुस्तफा ऊर्फ 'बोंडू ईशा अंसारी' याचे मित्र होते. गुरुवारी रात्री या सर्वांनी एकत्र मिळून मद्यप्राशन केले. पार्टी रंगात असतानाच एकाच्या मैत्रिणीला पैसे देण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दारूच्या नशेत हा वाद इतका विकोपाला गेला की, मुस्तफा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तंशूवर लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार केले.
परिसरात खळबळ...
या भीषण हल्ल्यात तंशूचा जागीच मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला ऋतिक पटले गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले की, "आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या परिचयाचे होते. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून हे हत्याकांड घडले आहे. आम्ही गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे."
(नक्की वाचा: Pimpri Chinchwad News: शांत बस म्हटल्याचा राग, दारूड्या मित्राच्या भावाने डोक्यात घातला दगड; तरुण जखमी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world