Latur News : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील 35 वर्षीय तरुण भरत महादेव कराड याने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे आज, 12 सप्टेंबर 2025 रोजी तातडीने लातूरला जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.
भरत कराडेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, "मी भरत महादेव कराड आताच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायमस्वरुपी संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आक्षण बचाव आनंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा."
या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी आजचे येवला मतदारसंघातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. ते विशेष विमानाने सकाळी 10 वाजता नाशिकहून लातूरला रवाना होणार आहेत.
(नक्की वाचा- Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार? नियमावली जाहीर; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस)
छगन भुजबळ यांचं ट्वीट
छगन भुजबळ यांनी ट्वीट करत म्हटलं की, "लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली! या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार रोजी लातूर येथे या आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे. सध्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य ओबीसीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण संविधान आणि कायद्यामुळे नक्की न्याय मिळेल,त्यासाठी लढावं लागणार आहे. त्याला आपण खंबीर आहोत. त्यामुळे कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना माझे कळकळीचे आवाहन आहे."