जाहिरात

Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार? नियमावली जाहीर; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Kunbi Certificate for Maratha Community: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसे मिळेल, यासाठी सविस्तर नियमावली (SOP - Standard Operating Procedure) जाहीर केली आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार? नियमावली जाहीर; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Kunbi Certificate : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Kunbi Certificate for Maratha Community: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सरकारने 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जीआर (Government Resolution) काढल्यानंतर आता मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसे मिळेल, यासाठी सविस्तर नियमावली (SOP - Standard Operating Procedure) जाहीर केली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय नियम आहेत आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? याची अनेकांना माहिती नाही. तुम्हाला ही माहिती नसेल तर काळजी करु नका. आम्ही ती सर्व माहिती तुम्हाला आता देणार आहोत. 

जीआरमध्ये काय आहे?

सरकारने काढलेल्या जीआरनुसार, ज्या मराठा व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नाही, त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित भागात राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत दिलेल्या पुराव्यांची सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करून खात्री करतील.

अर्जदाराच्या गावातील, कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असेल आणि ते अर्जदार त्यांच्या नातेसंबंधातील असल्याचं प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असतील, तर त्याची पडताळणी केली जाईल. स्थानिक समिती आणि वंशावळ समितीच्या मदतीने चौकशी करून अधिकारी अर्जदाराला कुणबी जातीचा दाखला देण्याबद्दल निर्णय घेतील.

( नक्की वाचा : Maratha reservation : 'कुणबी' दाखल्यासाठी अर्ज कसा कराल? वाचा सरकारी GR मधील संपूर्ण माहिती, सोप्या शब्दात! )

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नियमावली (SOP)

सरकारने जाहीर केलेल्या 4 पानांच्या नियमावलीमध्ये अर्जदाराची कसून चौकशी करण्याची पद्धत निश्चित केली आहे. या नियमावलीनुसार विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:

  • गावातील किंवा कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले आहे का?
  • अर्जदाराच्या नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे का?
  • जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबद्दल प्रतिज्ञापत्र दिले आहे का?
  • कुणबी संबंधित सण-उत्सव (उदा. बैलपोळा) साजरे होतात का?
  • पूर्वजांचा पेहराव (धोतर, पटका, लुगडे, चोळी) अशा प्रकारचा होता का?
  • कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या कुटुंबांप्रमाणेच चालीरिती आणि रीतीरिवाज आहेत का?
  • कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींबरोबर रोटी-बेटी व्यवहार (विवाह संबंध) होतात का?
  • कुलदैवत कोणते आहे? कुणबी जातीतील इतर आडनावांचे तेच कुलदैवत आहे का?
  • मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक 'कुणबा' करून एकत्र राहत होते का?

स्थानिक चौकशी प्रक्रिया

जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर तो अर्ज थेट गाव समितीकडे येतो. या समितीमध्ये तीन सदस्य असतात. ही समिती गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना बोलावून चौकशी करते. यामध्ये पोलिस पाटीलही उपस्थित राहतात. चौकशीनंतर अहवालावर समितीमधील तिघांच्या सह्या घेतल्या जातात. जात प्रमाणपत्रासाठी हा स्थानिक चौकशी अहवाल आणि सखोल तपासणी अनिवार्य असेल.

या संदर्भात बोलताना संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, अर्जदाराच्या दाव्यांची कसून तपासणी करण्यासाठी ही पद्धत निश्चित करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा पुरावा: 'हैदराबाद' आणि 'सातारा' गॅझेटियर नेमकं काय आहे? )

आवश्यक कागदपत्रे

कुणबी प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

  • शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
  • नोंदणीकृत दस्त किंवा वीज बिल (Registered Document or Electricity Bill)
  • ग्रामपंचायत दाखले (Gram Panchayat Certificates)
  • महसूली दस्त (Revenue Documents)
  • इतर कोणतेही शासकीय दस्त (Other Government Documents)
  • शिंदे समितीने ठरवून दिलेले दस्त (Documents specified by the Shinde Committee)

प्रतिज्ञापत्र (Affidavit)

ही सर्व कागदपत्रे आणि चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखला मिळू शकणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com