राज्यातील महायुती सरकारमध्ये आगामी काही महिन्यांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या कोट्यातील काही मंत्र्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांकडून समजते.
राज्यातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुका आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप अंतर्गत फेरबदलाची चर्चा रंगली आहे.
रवींद्र चव्हाणांचे मंत्रिमंडळात पुनरागमन?
भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. रवींद्र चव्हाण यांना मंत्री करून त्यांच्या जागी विदर्भ किंवा मराठवाडा विभागातील एखाद्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोट्यातील काही विद्यमान कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांना पदावरून हटवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojana: लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली; फॉर्ममधील 'त्या' एका प्रश्नाने महिलांचा गोंधळ)
शिवसेनेच्या मंत्र्यांचे काय होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातील काही मंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असल्याचे समजते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांच्या नावांची चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांना मंत्रिपदावर टांगती तलवाल असल्याचे समजते आहे. काही मंत्र्यांना संघटनात्मक कामासाठी मुक्त केले जाऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, अशा अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: 'वंदे भारत' ट्रेनमधील जेवण खात असाल तर सावधान! महिलेसोबत काय घडलं? VIDEO)
प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न
पुढील काळात होणाऱ्या निवडणुका पाहता, मराठवाडा आणि विदर्भाला अधिक प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष निवडीत या विभागांना प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांबाबतही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या संभाव्य फेरबदलामुळे महायुतीमधील अनेक इच्छुक आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर काही विद्यमान मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.