Maharashtra Election 2026: महापालिका निवडणुकीत कुणी काय कमावलं? कुणी काय गमावलं? वाचा ठळक मुद्दे

Maharashtra Election 2026: भाजप राज्यातील महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांनी सर्वाधिक जागा मिळवल्या.

जाहिरात
Read Time: 3 mins

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. मुंबईत शिवसेनेची 25 वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शहरी मतदारांवर आपली पकड मजबूत केली आहे.

भाजप राज्यातील महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांनी सर्वाधिक जागा मिळवल्या. महाराष्ट्रातील या महापालिका निवडणुकांमध्ये कुणी काय कमावलं आणि कुणी काय गमावलं याची सविस्तर माहिती घेऊयात

देवेंद्र फडणवीस आणि भाजप

या निवडणुकीचे सर्वात मोठे विजेते देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. भाजपने स्वबळावर मुंबईत (BMC) जवळपास 90 जागा जिंकत 2017 चा 82 जागांचा रेकॉर्ड मोडला. पुण्यातील 162 पैकी 50 हून अधिक जागा, नागपुरात 80 पेक्षा जास्त आणि नवी मुंबईत बहुमत मिळवून भाजपने शहरी महाराष्ट्रावर आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.

(नक्की वाचा-  TMC Election 2026: ठाण्याचा 'गड' शिंदेंकडेच! महायुतीला निर्विवाद बहुमत; वाचा 131 नगरसेवकांची संपूर्ण यादी)

एकनाथ शिंदे आणि शिवसेना

2022 च्या बंडांनंतर ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची लढाई होती. शिवसेनेने (शिंदे गट) 352 जागा जिंकून राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह राज्यभर शिंदे गटाने लक्षणीय कामगिरी केली.

Advertisement

महायुतीची कामगिरी

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीने एकत्रितपणे 1700 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. राज्य सरकारची विकासकामे आणि पायाभूत सुविधांच्या जोरावर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी मुसंडी मारली.

एमआयएम (AIMIM)

असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने 94 जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधले. भेंडी बाजार, कुर्ला, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मुस्लिम बहुल भागात त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या व्होट बँकचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले.

Advertisement

उद्धव ठाकरे यांची शिवसेना

शिवसेना उबाठाला या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला. मुंबईत 130 वरून त्यांची संख्या 65 वर आली. ठाकरे गटाचा गड मानल्या जाणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झाला. 25 वर्षांपासूनची मुंबई महापालिकेची सत्ता गेल्याने ठाकरे गटासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

(नक्की वाचा-  Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)

काँग्रेस (Congress)

शहरी महाराष्ट्रातून काँग्रेसचे अस्तित्व जवळपास पुसले जात असल्याचे या निकालातून दिसते. मुंबईत ते 24 जागांवर आले आहेत. पुणे आणि इतर शहरांमध्येही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. अंतर्गत गटबाजी आणि स्पष्ट अजेंडा नसल्याचा फटका त्यांना बसला.

Advertisement

राज ठाकरे आणि मनसे

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करूनही मतदारांनी त्यांना नाकारले. 'मराठी अस्मिता' या मुद्द्यावरूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत केवळ 6 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणांना गर्दी होते मात्र त्याचं मतात रुपांतर होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

शरद पवार

राजकारणाचे 'चाणक्य' मानले जाणाऱ्या शरद पवारांची जादू यावेळेस चालली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मुंबईत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. पुण्यासारख्या बालेकिल्ल्यातही त्यांना मोठे अपयश आले. राज्यात किरकोळ जागा जिंकल्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट) बॅकफुटवर गेला आहे.

अजित पवार

महायुतीत असूनही अजित पवारांनी मित्रपक्षांवर टीका करण्याची रणनीती आखली होती. पुण्यात त्यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली, पण मतदारांनी ती स्वीकारली नाही. जिथे एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी वेगळं लढूनही भाजप शिवाय आपलं अस्तित्व सिद्ध केलं. मात्र अजित पवारांना ते शक्य झालं नाही. यामुळे महायुतीतील त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.