
Governor CP Radhakrishnan on Hindi : राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावर वाद निर्माण झाला आहे. या विषयावर राजकीय पक्षासंह साहित्यिक तसंच संघटनांनीही सरकारवर टीका केलीय. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मराठी शिकणे आवश्यक आहे. हिंदीची सक्ती का? असा प्रश्न विचारला जात आहे. या विषयावर आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंच्या महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेनं केलाय. हा सर्व वाद ताजा असतानाच राज्यपाल सीपी राधाकृष्णनं यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंदी भाषा येत नाही, याची खंत वाटते असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. विविध देशांमधील रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिंदीसह अधिकाधिक भाषा शिकाव्या; हिंदी भाषा येत नाही याची खंत वाटते, असं राज्यपालांनी सांगितले.
विविध देशांमधील रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिंदीसह अधिकाधिक भाषा शिकाव्या; हिंदी भाषा येत नाही याची खंत वाटते : राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह विद्यापीठाच्या मुंबई येथील मुख्यालयात शनिवारी (19 एप्रिल) पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
( नक्की वाचा : Hindi language Row पहिलीपासून हिंदीचा फायदा काय? राज्य सरकारच्या आदेश काय सांगतो? पालकांनो नक्की वाचा )
काय म्हणाले राज्यपाल?
जगातील अनेक देश आज आपल्या कुशल कार्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत. मात्र अनेक देशात नोकरीसाठी तेथील भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा वयातच अधिकाधिक अधिक भाषा शिकाव्या तसेच जर्मन, जपानी, इटालियन, फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा शिकावी असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केले.
आपण अश्या राज्यातून येतो जेथे दुसरी भाषा शिकण्यास विरोध केला जात आहे. मात्र देशात हिंदी भाषा येणे आवश्यक आहे, असे सांगून आपणाला स्वतःला हिंदी भाषा येत नाही याची खंत वाटते असे राज्यपालांनी सांगितले.
हिंदी भाषा बोलता आली, तर आपण गोर-गरीब जनतेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो, असे सांगून जनसामान्यांच्या भावना जोवर समजून घेत नाही तोवर चांगला नेता होता येत नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
कौशल्य विद्यापीठाच्या युवा विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की युवकांना जपानला जायचे असेल तर अगोदर जपानी भाषा शिकून घ्यावी, जर्मनीला जायचे असेल तर जर्मन भाषा शिकावी. त्यामुळे नोकरी व्यवसाय करणे सुलभ होते,असे त्यांनी सांगितले.
जर्मनीमध्ये दंतवैद्यकाची अपॉइंटमेंट मिळण्याकरिता सहा सहा महिने थांबावे लागते. याकरिता आपल्या डॉक्टरांनी विदेशी भाषा शिकाव्या, असे सांगून आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंना जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा शिकण्यास वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे सांगितले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. लहान वयात भाषा शिकल्यास ती मोठेपणी संपदा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.
जगात आज बिगर कुशल कामगारांची देखील गरज असल्याचे सांगून इटलीच्या राजदूतांनी इटलीमध्ये द्राक्षे तोडण्यास कामगार हवे असल्याचे आपणास सांगितले असे स्पष्ट करत बिगर कुशल कामगारांना देखील विद्यापीठाने कौशल्य शिक्षण द्यावे अशी सूचना राज्यपालांनी केली.
भारतातील लोक इतर देशात काम करताना तेथील संस्कृती - कार्यपद्धतीशी लवकर जुळवून घेतात तसेच आपल्या देशात करतात त्यापेक्षाही अधिक चांगले काम करतात असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण कौशल्य अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले.
कौशल्य विद्यापीठाने आपल्या स्थापनेपासून कमी काळात जागतिक बाजारपेठेच्या गरज लक्ष्यात घेऊन अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
कालची कौशल्ये आज निरंक ठरत असल्यामुळे कौशल्य घेतल्यानंतर ते अद्ययावत करणे तसेच नवनवे कौशल्य शिकणे आजच्या काळात आवश्यक झाले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
जपान आणि चीन येथील लोकांनी स्वयंशिस्त, वक्तशीरपणा तसेच उत्तम कार्यसंस्कृतीमुळे चांगली प्रगती केली असल्याचे सांगताना विकसित भारताचे लक्ष्य गाठताना व त्यासाठी कार्यक्षमता वाढवताना हे गुण आपणाला अंगीकारावी लागतील असे त्यांनी सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने उद्योग जगतातून तज्ज्ञांना 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' म्हणून नियुक्त केल्यामुळे विद्यापीठाला उद्योग जगताच्या कौशल्य गरजांची माहिती होईल असे राज्यपालांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world