Mumbai Rains : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. मुंबई आणि उपनगरात जनजीवन विस्कळीत झाले असतानाच हवामान विभागाने (IMD) आज देखील पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी तर 'अत्यंत जोरदार पाऊस' पडेल, असाही इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 20 ऑगस्टपर्यंत मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये 'खूप जोरदार पाऊस' आणि काही ठिकाणी 'अत्यंत जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 'खूप जोरदार पाऊस' म्हणजे 115.6 ते 204.4 मिमी आणि 'अत्यंत जोरदार पाऊस' म्हणजे 204.5 मिमी पेक्षा जास्त पाऊस असतो.
(नक्की वाचा- Mumbai Rain LIVE: मुंबईत पावसाची बॅटिंग सुरुच, शाळांना सुट्टी!)
कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक (घाट), पुणे (घाट), सातारा (घाट) येथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंट अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने अशा स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- Maharashtra School Holiday: 'या' जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर, जाणून घ्या संपूर्ण यादी)
नागरिकांनी काय करावे?
पुढील काही दिवस कामाव्यतिरिक्त प्रवास करणे शक्यतो टाळावे. जर बाहेर असाल आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे टाळावे, कारण पाण्याचा अंदाज न आल्यास वाहने बंद पडण्याची शक्यता असते.
स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करावे. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचून वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कामावर जाण्यापूर्वी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या स्थितीची माहिती घ्यावी.