Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात सध्या महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदांवरून नाराजीनाट्य सुरू झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत गोगावले दोघेही अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोघांच्याही नाराजीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणावरून नाराजी
नाराजीचे मुख्य कारण म्हणजे, आगामी स्वातंत्र्य दिन समारंभासाठी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीनुसार, नाशिक येथे भाजप नेते गिरीश महाजन आणि रायगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी शिंदे गटाचे दादा भुसे आणि रायगडसाठी भरत गोगावले यांचे नाव अपेक्षित असताना, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा- Minister List: स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार? वाचा संपूर्ण यादी)
कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्री आणि गोगावले अनुपस्थित
सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आजच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले हे दोघेही अनुपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे श्रीनगर दौऱ्यावरून अजून मुंबईत परतले नसल्याने ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. तर, भरत गोगावले यांनी स्वतः या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "आजच्या कॅबिनेट बैठकीला मी अनुपस्थित राहणार आहे, कारण काही कामानिमित्त मी दिल्लीत आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये रक्तदानासाठी असल्याने तेही कॅबिनेटला अनुपस्थित असतील."
(नक्की वाचा- कल्याण-शिळफाटा मार्गावरील 11 ते 31 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद आणि पर्यायी मार्ग?)
भरत गोगावले यांनी पुढे बोलताना म्हटलं की, "आमची नाराजी वैगेरे काहीही नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे," असे सांगत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पष्टीकरणानंतरही, पालकमंत्रिपदांच्या निवडीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये काहीतरी बिनसले असल्याची दबकी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच आहे. आगामी काळात ही नाराजी कशी मिटवली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.