जाहिरात

महापालिका निवडणुकांपूर्वी महायुतीत धुसफूस; ठाणे, नवी मुंबईसह 18 ठिकाणी शिवसेना-भाजप-NCP मध्ये तणाव

अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू असल्याने शिवसैनिकांकडूनही स्वबळाचा नारा आता जोर धरू लागला आहे जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युती संदर्भात निर्णय मुख्यनेत्यांच्या सूचनेनंतर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकांपूर्वी महायुतीत धुसफूस; ठाणे, नवी मुंबईसह 18 ठिकाणी शिवसेना-भाजप-NCP मध्ये तणाव

विशाल पाटील, मुंबई

Political News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीतच धुसफूस पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध पहायला मिळतोय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरील आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्याने पहायला मिळाला

बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू असल्याने शिवसैनिकांकडूनही स्वबळाचा नारा आता जोर धरू लागला आहे जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युती संदर्भात निर्णय मुख्यनेत्यांच्या सूचनेनंतर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुठल्या जिल्ह्यांमध्ये महायुतीत धुसफुस?

ठाणे

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असताना इथे मंत्री गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी परस्पर स्वबळाचा नारा देत शिंदेंना डिवचले आहे. त्यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे. भाजप नेत्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे

नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे. मात्र शिंदेबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवी मुंबईत भाजप विरूद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे संबध टोकाचे ताणले गेल्याने इथेही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. 

(नक्की वाचा- Sangli News : बैलासह स्वत:लाही औताला बांधलं, तरुणासाठी माजी खासदार धावले, 1 लाखांचा बैल दिला भेट)

कल्याण डोंबिवली

या महानगरपालिकेत गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप आणि शिवसेनतील संबध टोकाचे ताणले गेलेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्षाकडून शिवसेनेविरोधात पाऊले उचलून अप्रत्यक्ष प्रतिस्पर्धींना मदत केली जात असल्याचं बोललं जात आहे. तसेच इथेही भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याने इथेही युतीची शक्यता धुसर आहे

मिरा भाईंदर

या महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे इथेही भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं मापं दिलं जात आहे. यातच यंदा पालिकेची जबाबदारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जबाबदारी देणयात आली असून इथेही भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू केल्याने शिवसेनेकडूनही आता स्वतंत्र प्रयत्न सुरू केले आहेत.

उल्हासनगर

उल्हासनगर शहरातही काही दिवसांपूर्वी भाजपने शहरातील समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावरून युतीतील संबध ताणले गेले आहेत. येथील स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी थेट महापालिका आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला होता. येथेही शिवसेनेची सत्ता होती. तर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वरचष्मा आहे.

अंबरनाथ

अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांवरून भाजपने पालिका प्रशासनाला कोंडीत धरण्यास सुरूवात केली आहे. अभिजीत करंजुले यांच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील पथदिवे, रस्ते आणि इतर समस्यांवरून पालिकेला टाळे ठोकण्याचा इशाराच दिला आहे. येथेही पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असून अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याने भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यात इथे जुंपली आहे.

बदलापूर

बदलापूर शहरात भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची चर्चा आहे. आमदार कथोरे यांनी थेट नगरपालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशाराच अधिकाऱ्यांना दिला आहे. चौकाचौकात पालिकेच्या गैरकारभाराचे पुरावे देणार असे सांगत कथोरे यांनी थेट पालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेलाच आव्हान दिले आहे.

(नक्की वाचा-  Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

सांगली

सांगलीत खानापूर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून लढलेले वैभव पाटील यांना भाजपने प्रवेश दिल्याने नाराजी आहे.

सातारा

साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात लढलेले सत्यजित सिंह पाटणकर यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. कित्येक वर्ष या दोन घराण्यांचा संघर्ष सुरू असताना भाजपने प्रवेश दिल्याने नाराजी आहे.

रायगड

मंत्री भरत गोगवले यांच्या विरोधात उबाठाकडून विधानसभा लढवलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष आहे. रायगडमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष उभे राहिलेल्या सुधाकर घारेंना प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी विरूद्ध शिविसेना हा संघर्ष शिगेला पेटला आहे.

नाशिक

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षात शितयुद्ध उघड आहे. भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद तर आहेच. याशिवाय भाजपकडून पालिकेत शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले जात आहे.

जळगाव

शिवसेनेचे पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिस्पर्धी वैशाली सुर्यंवशी यांना भाजपने प्रवेश दिला. नुसता प्रवेश न देता निधीही दिला जात असल्याने किशोर आप्पांनी उघडपणे युती होणार नसल्याचे म्हटले आहे. भाजप आम्हाला संपवायला निघाला असल्याची भावनाही बोलून दाखवली आहे

धुळे

धुळ्यात भाजपचे आमदार अमरिश पटेल यांची एकहाती सत्ता आहे. अशात शिंदेगटाची ताकद तिथे फारशी नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्य़ांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे.

हिंगोली

शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी वसमत व कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात स्वबळाचा नारा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनीही महायुती होणार नसेल तर आम्ही स्वबळावर निवडणुका लवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

नांदेड

नांदेडमध्येही चित्र काही वेगळे नाही. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात भाजपचे मिलिंद देशमुख रिंगणात होते. बालाजी यांचा विजय झाला, पण देशमुखांना भाजपकडून रसद पूरवली जात असल्याची सल सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात कायम आहे.

आहिल्यानगर

या जिल्ह्यात शिवसेनेची फारशी ताकद नाही मात्र भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा रोष आहे. त्यामुळे जिल्ह्यात युतीसोबत जाण्याबाबत संभ्रम आहे.

नंदूरबार

नंदूरबारमधील शिवसेनेच्याच आमदाराने माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याबाबतची तक्रार बैठकीत केल्याने इथेही भाजपसोबत संबध ताणले गेल्याची चर्चा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com