जाहिरात

Metro 4 News: प्रवास होणार सुसाट! मेट्रो 4 मार्गिकेचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण, मेट्रो कधी होणार सेवेत दाखल?

Metro 4 News: मुंबई-ठाणेकरांसाठी खूशखबर आहे, मेट्रो 4 मार्गिकेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

Metro 4 News: प्रवास होणार सुसाट! मेट्रो 4 मार्गिकेचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण, मेट्रो कधी होणार सेवेत दाखल?
"Mumbai Metro Line : मुंबई मेट्रो 4 बाबत महत्त्वाची माहिती"
Canva And MMRDA

Metro 4 News: मुंबई मेट्रो मार्गिका 4ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण 325 मेट्रिक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लाँच करण्यात आले आहेत. आठ हेवी ड्युटी क्रेन्स आणि 12 मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स बसवण्यात आले. या कामासाठी महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांसोबत एमएमआरडीएने समन्वय साधला.

नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले. या मोहिमेसाठी 35 अभियंते, 100 हून अधिक कुशल कामगार, 70 वाहतूक वॉर्डन आणि 25 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. नागरिकांना अत्यल्प त्रास होईल, याची विशेष काळजी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले. या स्टील स्पॅन्सच्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका 4 च्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे.

ठाणे आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

मेट्रो 4 आणि 4-अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो 11 या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने 58 किलोमीटर लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. वर्ष ऑक्टोबर 2026पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली–गायमुख) च्या टप्पा-1 गायमुख जंक्शन गायमुख गाव-घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळेस त्यांनी हे विधान केले होते. 

(नक्की वाचा: Pune Metro 3 News: पुणेकरांसाठी प्रचंड आनंदाची बातमी, मार्चमध्ये मिळणार मोठा दिलासा)

मेट्रो 4 आणि 4 अ मार्गाची वैशिष्ट्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ बद्दल माहिती देताना सांगितले होते की, घाटकोपर-मुलुंड -गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी 35 किलोमीटर असून मेट्रो 4 ची 32 किलोमीटर आणि मेट्रो 4 अ ची 2.88 किलोमीटर आहे. मार्गिकेत एकूण 32 स्थानके असून या प्रकल्पासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो 4, मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे 45 हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आलीय. या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो 11 ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ही 58 किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये 13 लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्‍पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com