ऋतिक गणकवार, मुंबई
Mumbai News: मुंबईतील मालाड पूर्व परिसरात एका भरधाव इनोव्हा कारने 4 वर्षांच्या चिमुकल्याला चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. लक्ष सिंह असे या मृत बालकाचे नाव असून, त्याच्या मृत्यूने संपूर्ण मालाड परिसर हादरून गेला आहे. हे बालक त्याच्या आई-वडिलांच्या लग्नानंतर तब्बल 20 वर्षांनी जन्माला आले होते. त्यांच्या कुटुंबाचा तो एकुलता एक आधार होता, जो आता काळाने हिरावून नेला आहे.
आनंदाचे रूपांतर शोकात
मालाड पूर्वेतील निलयोग विराट इमारतीमध्ये सिंह कुटुंबात एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. घरात नातेवाईकांची मोठी लगबग होती आणि आनंदाचे वातावरण होते. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास लक्ष हा इमारतीखाली इतर मुलांसोबत खेळत होता. मात्र, त्याच वेळी आलेल्या एका काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने या आनंदावर विरजण घातले.
(नक्की वाचा- UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
इमारतीखाली खेळत असताना एका काळ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा कारने लक्षला जोरदार धडक दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसत आहे की, धडक दिल्यानंतर चालक काही क्षण थांबला, मात्र त्यानंतर तिथून पळून गेला. अपघात झाल्यानंतर वॉचमनने तातडीने मुलाला उचलले आणि मदतीसाठी धावला, परंतु दुखापत इतकी गंभीर होती की चिमुकल्या लक्षचा प्राण वाचू शकला नाही.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)
आरोपीला बेड्या, कुटुंबाची न्यायाची मागणी
दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपी चालक रमेश देवजी जतरारा याला अटक केली आहे. पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत असून, चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचाही शोध घेतला जात आहे. "हा केवळ अपघात नसून चालकाचा मोठा निष्काळजीपणा आहे," असा आरोप सिंह कुटुंबाने केला आहे. 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेले आपले मूल गमावल्याने कुटुंबाचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world