निनाद करमरकर, उल्हासनगर
उल्हासनगर शहरात सर्रासपणे डान्सबारची छम छम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याकडे स्थानिक पोलिसांकडून कानाडोळा केला जात असल्याचं देखील दिसून येत आहे. त्यामुळे या डान्सबार्सची छमछम पोलिसांना ऐकू येत नाही का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विरोधकांकडून 'लाडका शेतकरी' योजनेवरून टीका करण्यात आल्यानंतर त्यांच्या काळात 'लाडका डान्सबार' होता असं प्रत्युत्तर काही दिवसांपूर्वीच सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं. मात्र असं असलं, तरीही आजही उल्हासनगर शहरात एक-दोन नव्हे, तर तब्बल 6 ते 7 डान्सबार विनादिक्कतपणे सुरू असल्याचं समोर आलं आहे.
(नक्की वाचा- ठाकरे गटाच्या निष्ठावंताची हत्या, पत्नीचं 'ठाकरे' कनेक्शन समोर आल्यानं खळबळ)
यापूर्वी डान्सबारची संख्या जवळपास 10 ते 12 होती. मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिकेने चांदनी, राखी, अॅपल, वर्षा अशा काही निवडक डान्सबारवर तोडक कारवाई करत ते जमीनदोस्त केले.
(नक्की वाचा- ऑन ड्युटी, फूल टाईट; दारुच्या नशेत डॉक्टर रुग्णालयात, गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार)
तर पॅराडाईज, आशियाना, आचल पॅलेस, नाईंटी डिग्री, हंड्रेड डेज, पेनिन्सुला असे अनेक डान्सबार मात्र अजूनही सुरूच आहेत. तिथे पहाटेपर्यंत छमछम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यातले काही डान्सबार तर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. मात्र तरीही पोलिसांना इथली छमछम कशी ऐकू येत नाही? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे उल्हासनगरातले हे 'लाडके डान्सबार' कधी बंद होणार? याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world