जाहिरात

Mast Money: कर्ज मंजूर करून खाजगी डेटावर ताबा, 5 लाख युजर्सनी डाउनलोड केलेले लोन ॲप पोलिसांच्या रडारवर

Mast Money App Fraud: गुगल प्ले स्टोअरवरील एका लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील लाखो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

Mast Money: कर्ज मंजूर करून खाजगी डेटावर ताबा, 5 लाख युजर्सनी डाउनलोड केलेले लोन ॲप पोलिसांच्या रडारवर
Mast Money App Fraud: नागपूर पोलिसांनी कामिल सिद्दिकी या उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे.
नागपूर:

Mast Money App Fraud: गुगल प्ले स्टोअरवरील एका लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील लाखो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मस्त मनी नावाच्या या धोकादायक ॲपद्वारे किमान 2 लाख लोकांची तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड आणि ॲप विकसित करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी मध्य प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांचे खाजगी फोटो चोरून ते अश्लील रित्या मॉर्फ करून ब्लॅकमेल करणाऱ्या या टोळीने देशभरात खळबळ उडवून दिली आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूर सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील बेर्सिया भागातून 31 वर्षीय कामिल सिद्दिकी या उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. कामिलने बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (BCA) आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA) असे उच्च शिक्षण घेतले असून, त्यानेच हे मस्त मनी ॲप विकसित केले होते. 

या फसवणुकीच्या धंद्यात तोच मुख्य मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1 मोबाईल, 2 सिम कार्ड आणि 1 लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीचा मुख्य किंगपिन वेगळा असून, त्याच्यासह इतर 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )

असा उघडकीस आला 200 कोटींचा घोटाळा?

मस्त मनी हे ॲप्लिकेशन संपूर्ण भारतात तब्बल 5 लाख 32 हजार युजर्सनी डाउनलोड केले होते. त्यापैकी अंदाजे 2 लाख 34 हजार युजर्सच्या मोबाईलमध्ये हे ॲप अजूनही इन्स्टॉल असल्याचे समोर आले आहे. ॲपचे सक्रिय सदस्य पाहता फसवणुकीची रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, अशी माहिती नागपूर सायबर पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी दिली आहे. 

या टोळीने गुन्हेगारीसाठी एक कॉल सेंटर, मार्केटिंग आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या 3 वेगवेगळ्या शाखा तयार केल्या होत्या. आरोपींच्या टेलिग्राम ग्रुप्स, बँक खाती आणि यूपीआय (UPI) व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

( नक्की वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास )
 

कसा व्हायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ?

सोशल मीडियाच्या माध्यमातून पैशांची गरज असलेल्या लोकांना हे ॲप डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जात असे. लोकांनी योग्य तपासणी न करता ॲपला परवानगी (अँप्रूव्हल) दिली की, एपीके (APK) फाईल्सच्या माध्यमातून त्यांच्या फोनमधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो आणि व्हिडिओचा ताबा मिळवला जात असे. 

नागपूर येथील एका पीडित महिलेने कर्जासाठी अर्ज केला असता, आरोपींनी आपण आरबीआय (RBI) अंतर्गत नोंदणीकृत असल्याचे खोटे कागदपत्रे दाखवून तिचा विश्वास संपादन केला. महिलेने कागदपत्रे आणि फोटो अपलोड केल्यानंतर तिचे 20 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. 

मात्र, विविध शुल्काच्या नावाखाली आधीच अर्धी रक्कम कापून तिला अत्यंत कमी पैसे देण्यात आले. त्यानंतर पैसे परत करण्यास थोडा उशीर होताच तिच्या मोबाईलमधील खाजगी फोटो काढून ते अश्लील रित्या मॉर्फ करण्यात आले. हे फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली.

नागपूर पोलिसांच्या तातडीच्या विनंतीनंतर गुगलने हे मस्त मनी ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे, तसेच लवकरच या घोटाळ्याची वेबसाईटही बंद केली जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी घाबरून न जाता तातडीने नागपूर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी केले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com