घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाकडून मोठी खूशखबर समोर आली आहे. येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोकण मंडळाच्या नवीन गृहनिर्माण योजनेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. दिवाळीत या घरांची संगणकीय लॉटरीकाढण्याचे नियोजन म्हाडा प्रशासनाने केले आहे.
या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि कोकण परिसरातील सुमारे 1,000 नागरिकांना हक्काचे घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
20 टक्के योजनेतील घरांचा समावेश आणि नवा नियम
या नवीन सोडतीत एकूण सुमारे 1000 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सुमारे 80 टक्के घरे आणि म्हाडाच्या स्वतःच्या योजनेतील उर्वरित 20 टक्के घरांचा समावेश असेल. यापूर्वी म्हाडाने 20 टक्के योजनेअंतर्गत तब्बल 6,000 घरांची मोठी लॉटरी काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेतील नवीन घरे आता म्हाडाऐवजी संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणांकडे वर्ग केली जाणार आहेत.
सरकारच्या या नव्या धोरणामुळे, यापूर्वीच म्हाडाकडे हस्तांतरित आणि प्राप्त झालेल्या घरांचीच लॉटरी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे.
कुठे उपलब्ध असणार घरे?
ही घरे प्रामुख्याने मुंबई महानगर प्रदेशातील आणि कोकणातील प्रमुख शहरांमध्ये असतील. दसऱ्याला जाहिरात प्रसिद्ध होताच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज विक्री आणि नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल.
ठाणे
नवी मुंबई
कल्याण-डोंबिवली
कोकण परिसर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world