MHADA Homes: म्हाडाची घरे मिळवण्यासाठी नागरिकांना बरेच प्रयत्न करतात. परंतु आता म्हाडाच्या लॉटरीत लागलेली घरे नागरिक परत करताना दिसत आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबर 2025 मध्ये काढलेल्या सोडतीतील तब्बल 45 टक्के विजेत्यांनी आपली घरे म्हाडाला परत केली आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती आणि अयोग्य ठिकाण यांमुळे सर्वसामान्यांनी म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे.
विजेत्यांनी का नाकारली म्हाडाची घरे?
काही वर्षांपूर्वी म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज यायचे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. घरे नाकारण्यामागे प्रामुख्याने ही कारणे सांगितली जात आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती आता खासगी विकासकांच्या घरांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही जास्त झाल्या आहेत. अनेक गृहप्रकल्प रेल्वे स्टेशन किंवा मुख्य शहरापासून लांब असल्याने दळणवळणाची समस्या जाणवते. खासगी प्रकल्पांच्या तुलनेत म्हाडाच्या घरांमध्ये सोयी-सुविधा कमी असल्याची भावना विजेत्यांमध्ये आहे.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
रिक्त घरांचा आकडा 14 हजारांवर
कोकण मंडळाच्या विविध सोडतींमधील विक्री न झालेल्या घरांची संख्या आता 14 हजारांच्या वर पोहोचली आहे. ऑक्टोबर 2025 च्या सोडतीत 5285 घरे होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने 762 घरे आधीच वगळावी लागली होती. म्हाडाकडे केवळ 10 टक्के प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे नाकारलेली 2000 घरे या यादीतून पूर्णपणे भरली जाणे अशक्य आहे.
(नक्की वाचा- What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर)
जर प्रतीक्षा यादीतील लोकांनीही ही घरे नाकारली, तर म्हाडाला ही घरे पुढील सोडतीत घ्यावी लागतील. तिथेही प्रतिसाद न मिळाल्यास ही घरे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर विकण्याची नामुष्की मंडळावर ओढवू शकते. यापूर्वीही म्हाडाला विरार आणि इतर भागांतील घरांसाठी ही पद्धत अवलंबावी लागली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world