
देवा राखुंडे, बारामती
बारामती तालुक्यात 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीने 8 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिला काही दिवसांपासून विशाल गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
(नक्की वाचा- एस्केलेटरवरून पडून वृद्धाचा मृत्यू, पुणे रेल्वे स्थानकातील घटना)
दिलेल्या तक्रारीनुसार,सप्टेंबर 2024 पासून यातील विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे हे संबंधित मुलीला मानसिक त्रास देत होते. ‘तू जर विशाल गावडेला नाही बोलली आणि त्याचे बरोबर लग्न नाही केले, तर तुझे घरातील कुणालाही जिवंत ठेवणार नाही. त्या सर्वांची कोयत्याने मुडंकी उडवीन", अशी धमकी दिली जात होती, असं मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
(नक्की वाचा- "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय)
या त्रासाला कंटाळून 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान मुलीने तिच्या राहत्या घरी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेसंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार आणि अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर कलमान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world