
Mumbai News : 'मतचोरी'च्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया' आघाडीचे नेते निवडणूक आयोगावर प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 'इंडिया' आघाडी निषेध आणि विरोधाचे राजकारण करत असताना, मनसे मात्र थेट संवाद साधून काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याचे दिसत आहे.
मनसेच्या भेटीचे मुद्दे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. सकाळी 11.15 वाजता मनसेचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल चर्चा करणार आहे. दुपारी 12.45 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्यासोबत मतदार यादी आणि बीएलए (Booth Level Agent) यांसारख्या मुद्द्यांवर बैठक होणार आहे.
(नक्की वाचा- Minister List: स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार? वाचा संपूर्ण यादी)
मनसेने जाहीर केलेल्या या भेटीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, 'इंडिया' आघाडीप्रमाणे केवळ आरोप न करता, पक्षाला त्यांच्या प्रश्नांवर थेट प्रशासकीय स्तरावर तोडगा काढायचा आहे. मनसेची ही भूमिका सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे.
काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप करून लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात, त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढला. याउलट, मनसे या गंभीर मुद्द्यावर थेट चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
राज ठाकरे यांची अलीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाढलेली जवळीक आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनापासून दूर राहणे, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच संकेत देत आहेत. यामुळे, आगामी काळात राज ठाकरे यांची भूमिका अधिक स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world