
MNS on Nishikant Dubey : भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषिकांविरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांसाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मनसेचे नाशिक शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी त्यांचे वकील मनोज सुरेश पिंगळे यांच्यामार्फत ही नोटीस 14 जुलै 2025 रोजी पाठवली आहे. निशिकांत दुबे यांनी माफी मागत, सोशल मीडियावर व्हायरल केलेले सगळे व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे.
नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, 7 जुलै 2025 रोजी एएनआय न्यूज (ANI News) आणि इतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार दुबे यांनी मराठी भाषिकांविरोधात अनेक अपमानजनक विधाने केली होती. ही विधाने डिजिटल मीडिया, यूट्यूब आणि 8 जुलै 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली आहेत. कोंबडे यांच्या मते, ही विधाने केवळ निराधारच नाहीत, तर ती समाजात तेढ निर्माण करणारी आणि बदनामीकारक आहेत.
( नक्की वाचा: 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेंना आणि 'शिवसेना' पक्ष ठाकरेंना मिळणार? )
खासदार निशिकांत दुबे यांनी केलेली वक्तव्ये मराठी माणसाच्या भावना दुखावणारी आणि आक्षेपार्ह असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. "अगर बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तरप्रदेश चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे...", "तुम किसकी रोटी खाते हो? तुम कौन सा टैक्स देते हो? कौनसी इंडस्ट्री है तुम्हारे पास?", "मराठी लोगों को यदि हिम्मत है तो उर्दू, तमिल और तेलुगु भाषियों को भी मारकर दिखाएं..." अशा काही वक्तव्ये निशिकांत दुबे यांनी केली होती, ज्यावरून वादंग उठलं होतं.
(नक्की वाचा - Monsoon Session: खबरदार! अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची खैर नाही, एकनाथ शिंदेंचा कडक इशारा)
नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, एका विद्यमान खासदाराने केलेली ही विधाने अत्यंत आक्षेपार्ह, फूट पाडणारी आणि बदनामीकारक आहेत. ही विधाने एका विशिष्ट भाषिक समुदायाला लक्ष्य करून द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत मराठी भाषिक नागरिकांची सार्वजनिक लेखी माफी निशिकांत दुबे यांनी मागावी. सर्व बदनामीकारक विधाने तात्काळ सोशल मीडियावरून काढून टाकावीत, अशी मागणी देखील नोटीसमधून करण्यात आली आहे. खासदार दुबे यांनी या मागणी वेळेत पूर्ण केल्या नाहीत, तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world