जाहिरात

Shiv Sena Election Symbol: 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेंना आणि 'शिवसेना' पक्ष ठाकरेंना मिळणार?

Shiv Sena Election Symbol Dispute: शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Shiv Sena Election Symbol: 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेंना आणि 'शिवसेना' पक्ष ठाकरेंना मिळणार?
मुंबई:

शिवसेना पक्षचिन्हाबाबत (Shiv Sena Election Symbol Dispute) सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होईल असे सांगितले आहे. शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर 'शिवसेना' पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्ह (Shiv Sena Election Symbol Dispute)  हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात कायदा जाणणाऱ्या तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केली असता त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर म्हटले की सर्वोच्च न्यायालय असा निकाल देऊ शकेल ज्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदेंना आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मिळेल. 

( नक्की वाचा: 'शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वाईट वाटलं', चव्हाण यांनी पहिल्यांदाच सांगितलं नाराजीचं कारण )

तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

तज्ज्ञांनी यासंदर्भात बोलताना म्हटले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहाता शिंदे हे ठाकरेंपेक्षा सरस ठरताना दिसत आहेत. या आधारावर धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळू शकते. निवडणूक आयोगाने आमदार फुटीच्या आधारे 'शिवसेना' पक्ष हा देखील एकनाथ शिंदे यांना दिला होता. उल्लेखनीय म्हणजे राज्यघटनेच्या परिशिष्ट दहानुसार आमदार अपात्रतेचा विषय न्यायालयात निकाली निघाला नाही. याच कारणास्तव निवडणूक आयोगाचा हा आदेश रद्द करत 'शिवसेना' पक्ष हा उद्धव ठाकरेंना दिला जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की ऑगस्ट महिन्यामध्ये सदरहू याचिका निकाली काढण्याचे न्यायालयाने सूतोवाच केले आहेत. त्या अनुषंगाने या आशयाचा निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारे या प्रकरणी योग्य तो निकाल देईल. साधारणपणे निकालाचे भवितव्य काय असेल याचा कायदेतज्ज्ञांनी बांधलेला हा निव्वळ अंदाज आहे.  सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल ऑगस्टमध्ये सुनावण्याची दाट शक्यता आहे. 

( नक्की वाचा: एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? दिल्लीत घडलेल्या घडामोडींची Inside स्टोरी )

शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अंतरिम दिलासा मिळावा अशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे या खंडपीठाला विनंती करण्यात आली होती. यावर खंडपीठाने अंतरीम सुनावणी करण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करणे अधिक योग्य असेल असे म्हटले. ऑगस्ट महिन्यात ही सुनावणी होणे अपेक्षित असून ऑगस्ट महिन्यातील तारीख सोमवारी संध्याकाळी कळण्याची शक्यता आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचा हवाला, कोर्टाकडे मागितला दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकांचा हवाला देत याचिकाकर्त्यांनी आपल्यालाही दिलासा मिळावा अशी याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात, अजित पवार गटाला हे जाहीर करण्यास सांगितले होते की, ‘घड्याळ' चिन्हाच्या वापराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ते शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.

( नक्की वाचा:बाहेर ये तुला दाखवतो! शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात तुफान राडा

न्यायालयाच्या कामकाज नसलेल्या दिवसांतही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी ही विनंती दोन वेळा करण्यात आली होती.  6 मे रोजी न्यायालयाने महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने ही विनंती करण्यात आली होती.  7 मे रोजी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर याचा उल्लेख करण्यात आला होता, त्यावर त्यांनी सदर प्रकरणाच काही तातडीची बाब आढळल्यास सुट्ट्यांमध्ये या प्रकरणाची सुनावणी करण्याचे संकेत दिले होते.  हे प्रकरण सूचीबद्ध न झाल्याने, 2 जुलै रोजी पुन्हा त्याचा उल्लेख करण्यात आला. त्यावेळी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने उद्धव ठाकरे यांच्या अर्जावर 14 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली होती.

प्रकरण नेमके काय आहे?

निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' पक्ष म्हणून मान्यता दिली होती, ज्यामुळे त्यांना 'धनुष्यबाण' हे अधिकृत चिन्ह आणि 'शिवसेना' हे नाव वापरण्याची परवानगी मिळाली. उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्रातील आगामी पोटनिवडणुकांसाठी 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. निवडणूक आयोगाने 1971 च्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्याचा दाखला देत हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com