निनाद करमरकर, अंबरनाथ
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात वेगळीच आघाडी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मदत करण्याचं जाहीर केलं आहे. अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी जाहीर केली आहे.
अंबरनाथमध्ये आमचा उमेदवार नसून अजून साहेबांचे काहीही स्पष्ट आदेश आम्हाला आलेले नाहीत. राजेश वानखेडे माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार. पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचं ते आम्ही पक्ष म्हणून पण ठरवू, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.
( नक्की वाचा : 'मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जीना', भाजपा नेत्याची खरमरीत टीका )
याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता, मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अंबरनाथमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला शुक्रवारी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित राहिले होते.
( नक्की वाचा : मुंबईत 20 टक्के मुस्लीम पण तिकीट देण्यात कंजुषी का? बड्या नेत्याची नाराजी, MVA ला फटका बसणार? )
याचवेळी अंबरनाथमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली, तसंच या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली. या भेटीमुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world