रेवती हिंगवे, पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, याच बैठकीत राज ठाकरे यांनी 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील 'पिट्याभाई' ही भूमिका साकारणारा आणि मनसे चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष असलेला अभिनेता रमेश परदेशी यालाही फटकारले.
रमेश परदेशी याने काही दिवसांपूर्वी संघाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून राज ठाकरे यांनी रमेश परदेशीला थेट प्रश्न विचारला आणि सुनावलं. "तू छातीठोकपणे सांगतोस, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा." एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा सल्ला त्याला दिला. मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षाला थेट राज ठाकरेंनी सुनावल्यामुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
(नक्की वाचा- Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड)
पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा
रमेश परदेशी याच्याबरोबरच, राज ठाकरे यांनी पुणे आणि परिसरातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ज्यांना काम करण्याची इच्छा नसेल, त्यांनी तातडीने आपलं पद सोडावं.
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेताना विचारले, "इतके दिवस काय काम केले हे दाखवा!" पक्षाने दिलेले काम, विशेषतः मतदार याद्या पूर्ण करण्याचे काम का केले गेले नाही, असा थेट सवाल त्यांनी केला. "आधी मतदार याद्या तयार करा आणि मगच बैठकीला या," असे स्पष्ट आदेश देत त्यांनी बैठकीत काम न करणाऱ्यांना चांगलेच झापले.
(नक्की वाचा- VIDEO: 'लग्न साधं केलं तरी पोरं होतात', मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदोरीकर महाराज ट्रोल)
फक्त पद घेऊन बसणाऱ्यांची पक्षात गरज नाही
राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, फक्त पद घेऊन बसणाऱ्यांची पक्षात गरज नाही. ज्यांनी दिलेले काम वेळेत पूर्ण केले नाही, अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना काढून टाकण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे आगामी काळात मनसेमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.