Mumbai Crime News: लोकलमध्ये जागेवरून वाद, प्रवाशाने दगड भिरकावला; नेम चुकला अन् भयंकर घडलं

Mumbai Crime News: वांद्रे रेल्वे स्थानकावर काल एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. दोन प्रवाशांमध्ये सुरू असलेल्या भांडणाशी काहीही संबंध नसताना, तिथे उभे असलेल्या निशांत खत्री या तरुण अकाउंटंटला आपली दृष्टी गमवावी लागली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई

Mumbai Crime News: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन प्रवाशांमधील वादात एका निरपराध प्रवाशाला आपला डोळा गमावावा लागला आहे. मालाडमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनंतर रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकावर काल एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. दोन प्रवाशांमध्ये सुरू असलेल्या भांडणाशी काहीही संबंध नसताना, तिथे उभे असलेल्या निशांत खत्री या तरुण अकाउंटंटला आपली दृष्टी गमवावी लागली आहे. पोलिसांना तातडीने तपासाची चक्रे फिरवत योगेंद्र जंगबहादूर यादव या आरोपीला अटक केली आहे. 

(नक्की वाचा-  MHADA Lottery: म्हाडा लॉटरी अखेरच्या क्षणी लांबणीवर, अर्ज नोंदणी पुढे ढकलली; काय आहे कारण?)

नेमकी घटना काय होती?

3 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 वर अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकल आली असता, दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यातील एकाने (आरोपीने) खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरील दगड दुसऱ्या प्रवाशावर भिरकावला. मात्र, तो दगड लक्ष्य असलेल्या प्रवाशाला न लागता डब्यात उभ्या असलेल्या निशांत खत्री यांच्या डोळ्याला लागला. या घटनेनंतर आरोपी योगेंद्र यादवने घटनास्थळावरून पळ काढला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.बी. बच्छाव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, ज्यामध्ये आरोपीचे वर्णन स्पष्ट झाले. गुप्त बातमीदारांकडून आरोपी दादर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता योगेंद्र यादव याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा असून सध्या वसई (पूर्व) येथे मजुरीचे काम करतो.

Advertisement

(नक्की वाचा- Pune News: अजितदादांच्या मृत्यूच्या दु:खादरम्यान पुणे मनपाचा अजब निर्णय; चौफेर टीकेनंतर प्रशासनाला जाग )

एक डोळा निकामी

दगडाचा प्रहार इतका तीव्र होता की निशांत यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाल्याचे सांगितले. एका प्रवाशाच्या बेजबाबदारपणामुळे एका मेहनती तरुणाचे आयुष्य अंधकारमय झाले आहे.
 

Topics mentioned in this article