BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३० डिसेंबर ही अखेरची तारीख संपली आहे. मुंबईतील राजकीय रणसंग्राम आता अधिक स्पष्ट झाला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या सत्तेची चावी मिळवण्यासाठी महायुती, काँग्रेस-वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्यात ही चौरंगी लढत होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राजकीय समीकरणांचा पेच सुटला आहे. निवडणुकीत महायुती, काँग्रेस-वंचित आघाडी आणि ठाकरे-मनसे युतीमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. युतीत जागा न मिळाल्याने अजित पवार गट स्वबळावर ९४ जागा लढवणार आहे.
(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)
पक्षनिहाय अधिकृत जागावाटप
महायुती
- भाजप- १३७
- शिवसेना (एकनाथ शिंदे) - ९०
ठाकरे बंधू-शरद पवार गट युती
- शिवसेना (UBT)- १६४
- मनसे - ५३
- राष्ट्रवादी (शरद पवार) - ११
काँग्रेस-वंचित आघाडी
- काँग्रेस- १३९
- वंचित बहुजन आघाडी - ६२
- रासप -१०
राष्ट्रवादी (अजित पवार) - ९४
ठाकरे बंधूंची युती
तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच युतीमध्ये लढत आहेत. मराठी मतांचे विभाजन रोखणे आणि 'ठाकरे' नावाचा ब्रँड टिकवणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. शरद पवार यांच्या पक्षानेही या युतीला ११ जागांवर पाठिंबा दिला आहे.
महायुतीतील पेच
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सन्मानजनक जागावाटप झाले असले तरी, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांना या युतीत जागा मिळू शकल्या नाहीत. परिणामी, त्यांनी ९४ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करून महायुतीलाच आव्हान दिले आहे.
(नक्की वाचा- BMC ELection 2026 Shivsena UBT Candidate List: शिवसेना (उबाठा)चे 113 उमेदवार ठरले, पाहा संपूर्ण यादी)
काँग्रेस आणि वंचितची नवी मैत्री
गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र लढणारे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यावेळी एकत्र आले आहेत. दलित आणि अल्पसंख्याक मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न या आघाडीतून केला जात आहे. ही निवडणूक केवळ जागा जिंकण्यासाठी नाही, तर मुंबईवर कोणाचे राज्य असणार आणि कोणत्या शिवसेनेला मुंबईकर स्वीकारणार, याचा फैसला करणारी ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world