मुंबई शहराच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टिनमध्येच अन्नाच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीतील उपहारगृहात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ताकाच्या ग्लासात माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने कर्मचारी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ताकात माशी अन् कांदा भजीत प्लास्टिकचा धागा
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका मुख्यालयातील या उपहारगृहातील निष्काळजीपणाचा फटका येथे नियमित जेवणाऱ्यांना बसत आहे. नुकत्याच घडलेल्या एका प्रकारात ग्राहकाला देण्यात आलेल्या ताकाच्या ग्लासात चक्क मेलेली माशी आढळून आली. इतकेच नव्हे, तर कांदा भजीची ऑर्डर दिली असता त्या भजीच्या आत प्लास्टिकचा धागा तळलेला आढळला.
(नक्की वाचा- Kolhapur News: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळा; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा)
उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आजारांचे निमंत्रण
या उपहारगृहात केवळ अन्नाचा दर्जाच खालावलेला नाही, तर तिथे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. उपहारगृहात अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ कोणत्याही झाकणाशिवाय उघड्यावर ठेवले जात आहेत, ज्यामुळे त्यावर माश्या आणि डास बसत आहेत.
पालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी आणि विविध कामांसाठी येणारे नागरिक मोठ्या संख्येने या उपहारगृहातील अन्नावर अवलंबून असतात. अशा प्रकारे उघड्यावर ठेवलेले आणि अस्वच्छ अन्न खाल्ल्याने विषबाधा किंवा गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कडक कारवाईची मागणी
इतर हॉटेल्स आणि कॅन्टीनवर स्वच्छतेचे नियम न पाळल्याबद्दल कारवाई करणारे पालिका प्रशासन आणि एफडीए (FDA) आपल्याच मुख्यालयातील या भोंगळ कारभारावर काय कारवाई करणार, असा रोखठोक सवाल आता विचारला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world