जाहिरात

Mumbai News: विक्रोळी-पंतनगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?

Mumbai News: मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर परिसरात 4 लाख 45 हजारांची लूट झाली.

Mumbai News: विक्रोळी-पंतनगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?
AI Image

ऋतिक भालेकर, मुंबई

Mumbai News: मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये सकाळी जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांत विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर या लगतच्या परिसरात सोनसाखळी चोरीच्या तब्बल 4 घटना समोर आल्या आहेत. दुचाकीवर येऊन गळ्यातील सोनसाखळी ओढणाऱ्या या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.

टोळीची 'मोडस ऑपरेंडी'

मिळालेल्या माहितीनुसार, हे चोरटे सकाळी 6 ते 9 या वेळेत जेव्हा नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात, तेव्हा सक्रिय होतात. एकट्या दुकट्या फिरणाऱ्या महिलांना टार्गेट केले जाते. दुचाकीवर मागून येऊन गळ्यातील चेन ओढून चोरटे वेगाने पसार होतात. विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार, एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

पोलिसांची धडक कारवाई, 2 चोरटे जाळ्यात

पंतनगर परिसरात चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 सोनसाखळी चोरांना पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ अटक केली आहे. विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात एकूण चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे एकाच पद्धतीने आणि जवळच्या परिसरात घडल्याने, ही एक संघटित टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा- Vande Bharat Train: मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचा मार्ग बदलणार? सांगली-मिरजकरांचा संताप; थेट PMO कडे धाव)

जॉगिंगला जाताना काय काळजी घ्याल

चोरट्यांच्या सुळसुळाटाच्या पार्श्वभूमीवर सकाळी फिरताना मौल्यवान दागिने किंवा सोन्याची साखळी अंगावर घालणे टाळा. शक्यतो एकटे न जाता ग्रुपमध्ये फिरायला जा. मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवा. जर कोणी संशयास्पद वाटल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी जा आणि पोलिसांना कळवा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com