जाहिरात

Vande Bharat Train: मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचा मार्ग बदलणार? सांगली-मिरजकरांचा संताप; थेट PMO कडे धाव

Mumbai-Bengaluru Vande Bharat : मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग मिरजऐवजी सोलापूरमार्गे वळवण्याच्या हालचालींमुळे सांगली आणि मिरजमधील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Vande Bharat Train: मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचा मार्ग बदलणार? सांगली-मिरजकरांचा संताप; थेट PMO कडे धाव

नुकत्याच मंजूर झालेल्या बहुप्रतिक्षित मुंबई-बेंगळुरू वंदे भारत (स्लीपर) रेल्वेच्या मार्गावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. ही रेल्वे आधी मिरज-पुणे-बेळगाव मार्गावरून धावणार होती. मात्र आता ती सोलापूर-गुंटकल मार्गे वळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे सांगली आणि मिरज परिसरातील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून थेट पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे धाव घेतली आहे.

15 हजार कोटींचा खर्च व्यर्थ?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सुमारे 15000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मार्गावर 130 किमी प्रति तास वेगाने गाड्यांची चाचणीही यशस्वी झाली आहे. मात्र, इतका मोठा खर्च करूनही या मार्गावर दिवसाला केवळ 15 गाड्या धावतात. याउलट, सोलापूर मार्गावर गाड्यांची संख्या प्रचंड आहे. नवीन वंदे भारत ट्रेनही सोलापूर मार्गे नेल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांवर अन्याय होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

आंदोलनाचा इशारा 

'सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच'चे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी या प्रकरणावर कडक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, "या रेल्वेमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार होती. मात्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे हा मार्ग बदलला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच हा मार्ग उपेक्षित राहत आहे."

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सांगली रेल्वे स्थानक परिसरात बेमुदत आंदोलन छेडले जाणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सांगली, माधवनगर आणि नांद्रे दरम्यान 'टॉय ट्रेन' चालवून उपरोधिक आंदोलन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

सोलापूर मार्ग आधीच 'फुल'

पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपचे सदस्य उमेश शाह यांनी सांगितले की, सोलापूर-गुंटकल-अनंतपूर हा पर्यायी मार्ग आधीच पूर्ण क्षमतेने वापरला जात आहे. तिथे 150 पेक्षा जास्त गाड्यांची ये-जा असते. तरीही प्रत्येक नवीन गाडीसाठी त्याच मार्गाला प्राधान्य दिले जात असल्याने पुणे-सांगली-हुबळी हा मार्ग दुर्लक्षित राहत आहे.

(नक्की वाचा-  Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! हायकोर्ट वकिलाची बीड बायपासवर निर्घृण हत्या)

दरम्यान, मिरज रेल्वे स्टेशनचे अधीक्षक जगजित तांदळे यांनी सांगितले की, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गाने धावणार याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत नोटिफिकेशन रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेले नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com