
'ठक-ठक गँग'ची दहशत मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाढली आहे. ही टोळी अतिशय चलाखीने धावत्या गाड्यांना लक्ष्य करते. त्यानंतर कुणाला काही समजण्याच्या आत मौल्यवान वस्तू घेऊन फरार होते. नवी मुंबईतील एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला आहे. जेव्हा तो कुर्ल्याच्या SLR पुलावरून खाली उतरत होता, तेव्हा त्याच्या गाडीला या टोळीच्या गुंडांनी लक्ष्य केले. ही संपूर्ण घटना गाडीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जसा गाडीचा वेग पुलावरून खाली उतरताना कमी झाला, तसाच एक तरुण अचानक येऊन गाडीच्या खिडकीवर जोरात 'ठक-ठक' करू लागला. जेव्हा ड्रायव्हरने काच थोडी खाली केली. तेव्हा मागून दुसरा व्यक्तीने गाडीच्या दुसऱ्या दरवाजावर 'ठक-ठक' करू लागला.
नक्की वाचा - Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी बातमी, कोल्हापुरकरांना दिलासा मिळणार?
त्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाले. पहिल्या आरोपीने सीटवर ठेवलेला मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, गाडीच्या सीटवर ठेवलेला त्याचा आयफोन चोर घेऊन पळून गेला. त्याला काही कळायच्या आत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेनंतर पीडित व्यक्तीने विनोबा भावे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
'ठक-ठक गँग'च्या अशा घटना या आधी दिल्ली, मेरठसह अनेक शहरांमध्ये समोर आल्या आहेत. पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी अचानक आपल्या गाडीचा दरवाजा किंवा खिडकी उघडू नका. आधी परिस्थिती समजून घ्या, त्यानंतरच काही पाऊल उचला. या गँगने आता मुंबईत आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सर्व सामान्यां बरोबरच मुंबई पोलिसांचे ही टेन्शन वाढले आहे. त्यामुळे या गँगचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी मुंबईकर करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world