
यंदाच्या वर्षी नेहमीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. अगदी मे महिन्यापासून पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा धरणं लवकर भरतील अशी अपेक्षा होती. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांश धरणं आता ओव्हरफ्लो झाली आहेत. धरणं पूर्ण भरल्यामुळे मुंबईकरांचा पाणी प्रश्न आता मिटला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा, वैतारणा आणि भातसा धरणं ओव्हरफ्लो होऊ लागलं आहे. यंदा शहरांबरोबरच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे धरणाची पातळी तब्बल 138 मीटरने वाढली आहे. याशिवाय धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले असून 1278.40 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
नक्की वाचा - Mumabi News: सावधान! मुंबईच्या समुद्रात उंच लाट उसळणार, 'या' दिवशी येणार मोठी भरती
सर्वसाधारणपणे ऑगस्ट शेवट ते सप्टेंबरपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण भरतात. मात्र यंदा जुलै अखेरीसच धरण ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दुसरीकडे धरणाजवळ राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हा आठवडा पावसाचा...
पुढील काही दिवस महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबई, उपनगर, पुणे, कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा तुफान पावसाचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवार 27 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लान करीत असाल तर याची खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोल्हापूर, सातारा या भागातही पुढील तीन ते चार दिवस तुफान पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तविण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world