जाहिरात

Mumbai News : धारावीच्या 30 महिलांचं सर्वत्र होतंय कौतुक, महिलांसाठी उपलब्ध केल्या 'या' मोठ्या संधी

कौशल्य विकासाला चालना देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Mumbai News : धारावीच्या 30 महिलांचं सर्वत्र होतंय कौतुक, महिलांसाठी उपलब्ध केल्या 'या' मोठ्या संधी
Mumbai Dharavi Women Success Story
मुंबई:

Mumbai Dharavi Woman News Today :  धारावीतील कुंभारवाडा परिसरातील 30 महिलांना मातीची भांडी बनविण्याच्या (पॉटरी) प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल धारावी सोशल मिशन (डीएसएम) यांच्या वतीने इलेक्ट्रिक पॉटरी व्हील (विद्युतचलित  चाक) प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकासाला चालना देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

धारावी सोशल मिशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून पारंपरिक कुंभारकामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुंभारवाडा हा पारंपरिक मातीच्या भांड्यांसाठी देशभर प्रसिद्ध असून अनेक पिढ्यांपासून येथील कुटुंबे या व्यवसायाशी निगडित आहेत.मात्र या प्रक्रियेत महिलांचा सहभाग प्रामुख्याने सहाय्यक भूमिकांपुरताच मर्यादित राहिला होता. इलेक्ट्रिक पॉटरी व्हीलच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिक सुलभ, कमी श्रमाचा आणि वेळ वाचविणारा ठरणार असून त्यामुळे महिलांचा सक्रिय सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

कुंभारवाड्यातील रहिवाशी महिलांनी दिली मोठी प्रतिक्रिया

प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी या कार्यशाळेमुळे कुंभारकामाच्या बारकाव्यांची अधिक चांगली समज झाल्याचे सांगितले. कुंभारवाड्यातील रहिवासी जिग्निशा जेठवा यांनी म्हटलंय की, “माझे वडील कुंभारकाम करतात.पण मला या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती.या कार्यशाळेमुळे मातीला योग्य आकार कसा द्यायचा,बोटांचा वापर कसा करायचा आणि प्रत्येक टप्प्यावर किती दाब द्यायचा याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच विविध प्रकारचे दिवे बनविण्याचेही कौशल्य आत्मसात करता आले".

नक्की वाचा >> Mumbai News : मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा ताफा अचानक थांबवला, 'या' उड्डाणपुलावर असं काही घडलं..पाहा व्हिडीओ

कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या मातीच्या वस्तूंना देशभरातून मागणी असते.विशेषतः दिवाळीच्या काळात रंगीबेरंगी मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असते. याबाबत जिग्निशा पुढे म्हणाली,“माझे कुटुंब दिवाळीसाठी दिवे तयार करते.पण यापूर्वी मी त्यांना मदत करू शकत नव्हते.या प्रशिक्षणानंतर आता मी कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावू शकेन असे वाटते.इलेक्ट्रिक चाक पारंपरिक चाकाच्या तुलनेत अधिक वेगवान आहे आणि उत्पादन वाढविण्यास मदत करणारे आधुनिक तंत्रज्ञान असल्याची जाणीव झाली. 

 धारावी सोशल मिशन महिलांचे सशक्तीकरण

ही प्रशिक्षण कार्यशाळा कुंभारवाड्यातील अनुभवी कुंभार आणि प्रशिक्षक नरसी रामजी वाला (55) यांनी घेतली. गेल्या 15 वर्षांपासून ते कुंभारकामाचे प्रशिक्षण देत आहेत. त्या म्हणाल्या की, “कुंभारकामासाठी संयम, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य तंत्राची आवश्यकता असते. इलेक्ट्रिक चाकाच्या वापरामुळे कारागिरांना काम अधिक अचूकपणे करता येते आणि गुणवत्तेसोबतच सर्जनशीलतेवरही अधिक लक्ष केंद्रित करता येते.”

नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात 'या' ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव, गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कार्यशाळेत सहभागी झालेल्या आणखी एक महिला लक्ष्मी योगेश सोळंकी यांनी भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मातीची भांडी आणि भांडी बनविण्याचा व्यवसाय सध्या पुन्हा लोकप्रिय होत आहे. अनेकजण मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आणि अन्न सेवन करणे पसंत करतात. त्यामुळे भविष्यात स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्याची माझी इच्छा आहे.” अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे धारावी सोशल मिशन महिलांचे सशक्तीकरण, पारंपरिक कारागिरांना आधुनिक साधनसामग्रीची जोड आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com