Mumbai News: डॉक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे एका 10 वर्षांच्या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबाला तब्बल 7 वर्षे भयानक मनस्ताप सहन करावा लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. मुलीला सतत येणारा खोकला आणि वजनातील घसरणीमुळे ती गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगत वेगवेगळ्या डॉक्टरांनी तिच्यावर टीबी (क्षयरोग) आणि दम्याचे उपचार सुरू ठेवले. मात्र, प्रत्यक्षात तिच्या डाव्या फुप्फुसात पेनचे झाकण अडकलेले होते. सततच्या संसर्गामुळे आणि फुप्फुसाचे टिश्यूज पूर्णपणे खराब झाल्यामुळे अखेर डॉक्टरांना तिचे सुमारे एक तृतीयांश फुप्फुस शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागले आहे.
नेमके काय घडले?
धारावी येथे राहणाऱ्या मैमुना शेख यांची 10 वर्षांची मुलगी मैशा हिला लहानपणापासूनच सतत खोकला येणे, वजन कमी होणे आणि फुफ्फुसात वारंवार निमोनिया होणे असा त्रास होत होता. अनेक डॉक्टरांनी तिला अँटीबायोटिक्स दिली. त्यानंतर तिला बीएमसी (BMC) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे थुंकीची चाचणी निगेटिव्ह आलेली असतानाही डॉक्टरांनी तिच्यावर 'प्रिझम्प्टिव्ह टीबी'ची अत्यंत जड औषधे सुरू केली.
टीबीचे औषध देऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पालकांनी एका खासगी रुग्णालयात दाखवले. तिथे डॉक्टरांनी तिला 'दमा' असल्याचे सांगून इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला.
(नक्की वाचा- MPSC Paper Leak: एमपीएससी पेपर लीकचा आरोप; व्हायरल चॅट्समुळे खळबळ, स्कीनशॉट्स 'NDTV मराठी'च्या हाती)
'एसआरसीसी' रुग्णालयात उघडकीस आला धक्कादायक प्रकार
मुलीची प्रकृती खालावत चालल्याने मैमुना यांनी तिला एसआरसीसी बाल रुग्णालयात दाखल केले. तेथील ज्येष्ठ फुप्फुसरोग तज्ज्ञ डॉ. इंदू खोसला यांनी मुलीचा सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपी केली. सीटी स्कॅनमध्ये मुलीचे एक फुप्फुस आकुंचन पावलेले दिसले. डॉक्टरांनी जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली, तेव्हा डाव्या फुप्फुसाच्या नळीत अत्यंत खोलवर एक पेनचे झाकण अडकलेले दिसून आले. नाक-कान-घसा (ENT) तज्ज्ञ आणि ॲनेस्थेशिया टीमच्या मदतीने हे झाकण यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- MPSC Paper Leak: एमपीएससी पेपर लीकचा आरोप; व्हायरल चॅट्समुळे खळबळ, स्कीनशॉट्स 'NDTV मराठी'च्या हाती)
फुप्फुसाचा भाग काढावा लागला
पेनचे झाकण काढल्यानंतर मुलीला तात्काळ आराम मिळाला आणि संसर्ग कमी झाला. मात्र, हे झाकण गेल्या 7 वर्षांपासून फुप्फुसात अडकून राहिल्याने तिथला भाग पूर्णपणे सडला होता आणि संसर्ग पसरला होता. डॉक्टरांनी महिनाभर वाट पाहिली की फुप्फुस पूर्ववत पसरते का? मात्र गंभीर संसर्गामुळे पेशी पूर्णपणे मृत झाल्या होत्या. अखेर मुलीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचे एक तृतीयांश फुप्फुस शस्त्रक्रियेद्वारे काढावे लागले.
डॉक्टरांच्या मते, मुलगी आता सामान्य आयुष्य जगू शकेल. मात्र, केवळ डॉक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे आपल्या मुलीचा जीव धोक्यात आला आणि उपचारांवर मोठा खर्च झाला, असा संताप तिच्या आईने व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world