जाहिरात

Mumbai News: मुंबईत 'हनीट्रॅप' अन् सायबर फ्रॉडचा थरार! 'बंबल' ॲपवरील मैत्री पडली महाग; तरुणाला लाखोंचा गंडा

Mumbai Honeytrap Fraud: मुंबईतील भायखळा येथील इंटिरियर डिझायनरला 'बंबल' (Bumble) या डेटिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल 21.5 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai News: मुंबईत 'हनीट्रॅप' अन् सायबर फ्रॉडचा थरार! 'बंबल' ॲपवरील मैत्री पडली महाग; तरुणाला लाखोंचा गंडा

रिझवान शेख, मुंबई

सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सचा वापर हल्ली केवळ ओळखीसाठीच नाही, तर सायबर गुन्हेगारांकडून लोकांना लुटण्यासाठी कसा केला जातो, याचे एक धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आले आहे. बंबल डेटिंग ॲपवर झालेल्या एका साध्या 'स्वाइप'मुळे मुंबईतील एका व्यक्तीला तब्बल 21.5 लाख रुपये गमवावे लागले आहेत. एका कथित हनीट्रॅप आणि ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळ्यात या तरुणाची फसवणूक झाली आहे.

'बंबल' ते 'व्हॉट्सॲप' असा झाला संपर्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा (Byculla) येथे राहणारा 38 वर्षीय तरुण इंटिरियर डिझायनर (Interior Designer) आहे. काही दिवसांपूर्वी त्याची 'बंबल' डेटिंग ॲपवर एका अज्ञात तरुणीशी ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये ॲपवरच गप्पा सुरू झाल्या. हळूहळू त्या तरुणीने तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांचे संभाषण बंबलवरून टेलिग्राम आणि नंतर व्हॉट्सॲपवर सुरू झाले.

'डार्विनएक्स' प्लॅटफॉर्मवरून गुंतवणुकीचे आमिष

तरुणाचा पूर्ण विश्वास जिंकल्यानंतर, त्या तरुणीने त्याला ऑनलाईन शेअर्स आणि फॉरेक्स ट्रेडिंगची माहिती दिली. कमी कालावधीत प्रचंड नफा कमावता येतो, असा दावा तिने केला. तिने त्याला 'डार्विनएक्स' नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आणि भरघोस परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

50 हजारांपासून सुरुवात, पुढे लाखो रुपये ट्रान्सफर

तरुणीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने 1 एप्रिल रोजी सुरुवातीला 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर एका बनावट डॅशबोर्डवर त्याला मोठा नफा दिसत होता. हा आभासी नफा पाहून त्याचा विश्वास आणखी वाढला. त्यानंतर, सायबर भामट्यांनी त्याला अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. पुढील काही आठवड्यांत तरुणाने आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर 10 लाख आणि 11 लाख रुपयांचे मोठे व्यवहार केले. अशा प्रकारे त्याने एकूण 21.5 लाख रुपये ट्रान्सफर केले.

69 लाखांचा नफा दाखवला, पण...

गुंतवणूक केल्यानंतर तरुणाने जेव्हा त्याच्या अकाउंटचा डॅशबोर्ड तपासला, तेव्हा त्याला त्यावर तब्बल 69 लाख रुपयांचा नफा दिसत होता. मात्र, जेव्हा त्याने ही रक्कम खात्यातून काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खऱ्या फसवणुकीला सुरुवात झाली.

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

30% ॲडव्हान्स टॅक्सची मागणी 

सायबर चोरांनी त्याला सांगितले की, 69 लाख रुपये काढण्यापूर्वी त्याला एकूण रकमेवर 30 टक्के 'ॲडव्हान्स टॅक्स' भरावा लागेल. पैसे देण्याऐवजी आरोपी वारंवार आणखी पैशांची मागणी करत असल्याने तरुणाला संशय आला. आपल्याला फसवले गेल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइनशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे सेंट्रल रिजन सायबर पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस सध्या बँक खाती, डिजिटल व्यवहार आणि त्या कथित तरुणीच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सचा माग काढत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com