
Mumbai News: मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे चर्चेत असलेली मुंबईची मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरती बंद होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे मोनोरेलच्या प्रवाशांना पुढील काही दिवस प्रवास करताना अडचणी येऊ शकतात.
गेले काही दिवस मोनोरेल सेवा नेहमीच उशिराने आणि तांत्रिक बिघाडांमुळे थांबत होती. यावर उपाय म्हणून MMRDA ने जुन्या मोनोरेलचे नूतनीकरण (retrofit) करणे, नवीन रेक सुरू करणे आणि एक अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रात्रीच्या वेळेत केवळ 3.5 तास मिळतात, ज्यामुळे कामात मोठा अडथळा येत होता. हे काम जलद गतीने आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी मोनोरेल सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Central Railway Power Block : आजपासून मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा विशेष ब्लॉक; नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द)
या मोठ्या बदलांमध्ये, हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवली जात आहे. यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून, दोन गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळेल. याशिवाय, MMRDA ने 10 नवीन ‘मेक-इन-इंडिया' रेकची खरेदी केली आहे. यापैकी 8 रेक मुंबईत आले आहेत, आणि त्यांचे टेस्टिंग सुरू आहे, तर 9 वा रेक तपासणीसाठी तयार आहे.
(नक्की वाचा- New Vehicle Policy: मुख्यमंत्र्यांपासून अधिकाऱ्यांना किती लाखांची गाडी खरेदी करता येणार? चेक करा लिस्ट)
या निर्णयाबद्दल बोलताना, MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "ही तात्पुरती अडचण ही मोनोरेलला नवजीवन देण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा मोनोरेल पुन्हा सुरू होईल, तेव्हा ती अधिक ताकदीने, सुरक्षित आणि विश्वासार्ह होऊन मुंबईकरांची सेवा करेल, याची आम्ही खात्री देतो." महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि MMRDA चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. "मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबईकरांच्या सहकार्याने आम्ही मोनोरेलला अधिक मजबूत स्वरूपात परत आणू,” असे ते म्हणाले. ही सेवा सुरू झाल्यावर चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world