
मुंबई शहर आणि उपनगरे क्षेत्रात नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्यंत तत्परतेने स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा परिसर स्वच्छ केला आहे. 15 ते 23 ऑगस्ट 2025 पर्यंत एकूण 952.5 मेट्रिक टन कचऱ्याचे निष्कासन करण्यात आले आहे. 380 कर्मचाऱ्यांनी एकूण 6 संयंत्रांच्या सहाय्याने 24 x 7 अथक प्रयत्न करून हे सहा समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ, सुंदर केले.
19 आणि 20 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई शहर व उपनगरे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या संबंधित विविध विभागांच्या वतीने तात्काळ विविध उपाययोजना करण्यात आले. याच अनुषंगाने, पावसामुळे निर्माण झालेला कचरा संकलित करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने, मुंबईतील स्वराज्य भूमी गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 23 ऑगस्ट 2025 पर्यंत या समुद्रकिनाऱ्यांवरून एकूण 952.5 मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. यासाठी 380 स्वच्छता कर्मचारी 6 संयंत्रांच्या सहाय्याने 24 x 7 कार्यरत होते.
समुद्रकिनाऱ्यांवर करण्यात आलेली स्वच्छता आणि मनुष्यबळ
• स्वराज्यभूमी – 23 मेट्रिक टन (16 मनुष्यबळ आणि 1 संयंत्र)
• दादर-माहीम – 300 मेट्रिक टन (48 मनुष्यबळ आणि 1 संयंत्र)
• वेसावे – 200 मेट्रिक टन (120 मनुष्यबळ आणि 1 संयंत्र)
• जुहू – 375 मेट्रिक टन (150 मनुष्यबळ आणि 1 संयंत्र)
• मढ-मार्वे – 34.5 मेट्रिक टन (35 मनुष्यबळ आणि 1 संयंत्र)
• गोराई – 20 मेट्रिक टन (14 मनुष्यबळ आणि 1 संयंत्र)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world