ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : मुंबईतील पायधुनी भागातील एका घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. एका हसऱ्या-खेळत्या डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा अचानक मृत्यू झाला. रात्री बिर्याणी आणि त्यानंतर उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर पहाटे या कुटुंबातील चौघांची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर कलिंगडाच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. सुरुवातीला मृत्यूचं कारण 'फुड पॉयझनिंग' असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.
कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू...
कलिंगड खाल्यानंतर एकाच घरातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक phosphite चे अंश आढळून आले आहेत. चौघांच्या शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाइट आढळून आलं आहे. अखेर ११ दिवसांनी या प्रकरणाचा छडा लागला. २६ तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्लं होतं त्यामुळे कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. २६ तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता.
फॉरेन्सिक रिपोर्ट शरीरातील अवयव हिरवे पडले...
सुरुवातील फूड पॉइजनिंगचं प्रकरण असल्याचं मानलं जात होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमुळे प्रकरणाने वेगळच वळण घेतलं. सूत्रांनुसार, जेव्हा मृतांच्या शरीराचा तपास झाला, तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. मृतांचे अंतर्गत अवयव उदा, मेंदू, हृदय आणि आतड्यांचा रंग हिरवा झाला होता. सर्वसाधारणपणे शरीरातील अवयवांचा रंग बदलण्यामागील कारण विषामुळे होत असल्याचं दिसतं.
एफडीएकडून तपास...
या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट FDA म्हणजे फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर झाला. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील वेगवेगळ्या ११ पदार्थांचे नमुने घेतले. यामध्ये रात्रीची बिर्याणी, कलिंगडाचे तुकडे, फ्रिजमधील पाणी, तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश होता. हैराण करणारी बाब म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये कोणतंही विषारी द्रव्य आढळून आलं नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world