Tiger Memon Mumbai Office : बाबरी मशीद पाडल्यानंतर जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत दुसऱ्यांदा दंगल झाली तेव्हा सोने-चांदीचा तस्कर मुश्ताक ऊर्फ टायगर मेमनचं कार्यालय शिवसैनिकांनी जाळलं.
माहिममध्ये शितलादेवी मंदिराजवळ ५२ चौरस मीटरच्या दुकानातून टागर मेमन आपली कंपनी तिजारत इंटरनॅशनलचे कार्यालय चालवत होता. स्वत:चं जळालेलं कार्यालय पाहून टायगर मेमन संतापला होता. त्यानंतर अख्खी मुंबई जाळून टाकेन असा निश्चय त्याने केला होता. या घटनेनंतर त्याने मुंबई बॉम्बस्फोटाचा प्लान आखला. १२ मार्च १९९३ रोजी हा प्लान अमलात आणण्यात आला. १२ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा जीव गेला होता आणि ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. आज साफेमा कायद्याअंतर्गत, टायगर मेमन कार्यालय चालविणाऱ्या दुकानाचा लिलाव करण्यात आला.
कितीला झाला लिलाव?
बॉम्बस्फोटाच्या कटाचा खुलासा झाल्यानंतर टाडा कायद्याअंतर्गत टायगर आणि त्याच्या कुटुंबाची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. आता केंद्र सरकारच्या वतीने एक एक करीत त्याच्या सर्व संपत्तीचा लिलाव केला जात आहे. याअंतर्गत तस्कर आणि परकीय चलन फेरफार करणारे (मालमत्ता जप्ती) कायदा, १९७६ (SAFEMA) अंतर्गत सक्षम प्राधिकारींनी मंगळवारी टायगर मेमनच्या दुकानाचा लिलाव केला. १९९४ मध्ये हे दुकान सील करण्यात आलं होतं. प्राधिकरणाकडून या दुकानाचं रिजर्व्ह मूल्य २ कोटी ५ लाख रुपये ठेवण्यात आलं. लिलावासाठी केवळ एकच व्यक्ती समोर आली, ज्याची माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे.
मेमनच्या आलिशान इमारतीचही मोठं नुकसान...
विशेष टाडा न्यायालयाच्या परवानगीनंतर प्राधिकरणाने १७ संपत्ती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. जी संपत्ती ताब्यात घेण्यात आली आहे, त्यात सांताक्रूझचा कोले कल्याण भूखंड आहे, जो १२०० चौरस फुटाचा आहे. याशिवाय मुंबईतील जव्हेरी बाजारात जमिनीचा एक तुकडा प्राधिकरणाच्या ताब्यात असून येथे टायगर मेमनची आलिशान इमारत होती. या जागेशी संबंधित एक रंजक बाब म्हणजे, टायगरच्या आदेशानंतर जेव्हा त्याचे हस्तक आरडीएक्सने भरलेली स्कूटर वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करत होते, तेव्हा त्यापैकी एका हस्तकाने चुकून ही स्कूटर त्याच्याच इमारतीबाहेर पार्क केली होती. जव्हेरी बाजारात झालेल्या स्फोटात १७ लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यात टायगर मेमनच्या इमारतीचं नुकसान झालं होतं. यानंतर गोविंद खैरनार नावाच्या एका बीएमसी अधिकाऱ्याने इमारतीचा उर्वरित भाग बुलडोझरने पाडला. आता बीएमसी त्या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी करते.
यापूर्वीही वेगवेगळ्या एजन्सीने टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमच्या सर्व संपत्तीचा लिलाव केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके गावातील दाऊदचा वडिलोपार्जित वाडा आणि मुंबईतील जयराजभाई लेन येथील औद्योगिक वसाहत यांचा प्रामुख्याने समावेश होतो. लवकरच सफेमाचं प्राधिकरण टायगर मेमनच्या जप्त केलेल्या इतर संपत्तीचा लिलाव करेल. टायगर मेमन सध्या पाकिस्तान आहे. तो तिथे शीतगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय चालवतो असं म्हटलं जातं. त्याचा भाऊ, याकूब मेमन याला ३० जुलै २०१५ रोजी नागपूर तुरुंगात फाशी देण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world