Mumbai One App: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आणि मुंबई मेट्रो लाईन-3 च्या अंतिम टप्प्यासह 'मुंबई वन' या अत्यंत महत्त्वाकांक्षी ॲपचे उद्घाटन करण्यात आले. हे ॲप मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासाच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणणार आहे.
'मुंबई वन' हे ॲप भारतातील पहिले इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप आहे. या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 11 सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवठादारांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणते. यामध्ये खालील प्रमुख सेवांचा समावेश आहे.
- मुंबई मेट्रो : लाईन 1, 2A, 3 (अक्वा लाईन) आणि 7.
- नवी मुंबई मेट्रो
- मुंबई मोनोरेल
- मुंबई उपनगरीय रेल्वे
- BEST बसेस
- ठाणे महानगरपालिका परिवहन (TMT)
- मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन (MBMT)
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन (KDMT)
- नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT)
(नक्की वाचा: लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती)
यामुळे आता मुंबईकर एका मेट्रोतून उतरून लोकलने, मोनोरेलने किंवा बसने प्रवास करत असला तरी त्याला प्रत्येक वेळी वेगळे तिकीट काढण्याची गरज राहणार नाही.
प्रवाशांना काय फायदे होणार?
- 'मुंबई वन' ॲप प्रवाशांसाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. याचा थेट परिणाम प्रवासाचा अनुभव अधिक सोपा आणि कार्यक्षम बनण्यावर होईल.
- हे ॲप प्रवाशांना विविध वाहतूक पर्यायांसाठी एकच क्यूआर (QR) कोड आधारित डिजिटल तिकीट खरेदी करण्याची सोय देते. यामुळे तिकीट खिडकीवर लागणाऱ्या रांगेत उभे राहण्याची गरज पूर्णपणे संपुष्टात येईल.
- तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचेल. तसेच, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाल्याने व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित होतील.
- प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या मार्गाचे नियोजन करण्यासाठी हे ॲप मदत करते. यात पर्यायी मार्ग आणि टाईमटेबलचीबी माहिती मिळते.
- प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ॲपमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एसओएस (SOS) बटण देण्यात आले आहे.
- जवळपासची मेट्रो/बस स्थानके, महत्त्वाचे पर्यटन स्थळे आणि ठिकाणांची नकाशा-आधारित माहिती देखील ॲपवर उपलब्ध असेल.
(नक्की वाचा: Navi Mumbai International Airport Inauguration: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या 7 गोष्टी माहितीये का?)
'मुंबई वन' ॲप कसे वापरावे?
- Google Play Store किंवा Apple App Store वरून 'Mumbai One' ॲप डाउनलोड करा.
- तुमचा मोबाईल नंबर वापरून ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करून ॲपमध्ये लॉग-इन करा.
- तुम्हाला जिथून प्रवास सुरू करायचा आहे ते ' स्थानक' आणि जिथे जायचे आहे ते 'स्थानक' निवडा. ॲप तुमच्या जवळपासचे स्थानक आपोआप ओळखू शकते.
- एका व्यवहारात तुम्ही जास्तीत जास्त 4 तिकीटं बुक करू शकता.
- UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल पद्धतीने तिकीटाचे भाडे भरता येणार.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुमच्या फोनवर लगेच एक क्यूआर (QR) कोड तयार होईल. मेट्रो स्थानकांवर हा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही आपला प्रवास सुरू करू शकता.